कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा-पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणार्‍या घटकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असा आदेश बुधवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. यावेळी शिरोळचे आमदार उल्हास पाटील, आमदार अमल महाडिक व नदी प्रदूषण विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कदम यांनी जबाबदार अधिकार्‍यांना खडसावत कायद्याचे काटेकोरपणे पालन करा, एक थेंब सुध्दा विना प्रक्रिया दूषित पाणी पंचगंगा कृष्णा नदीत सोडू देऊ नका अन्यथा दोषींची गय केली जाणार नाही असा सज्जड दम दिला. कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणणा करु नका अन्यथा मला मंत्री म्हणून वेगळी पाऊले उचलावी लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शिरोळ तालुक्यातील कर्करोगाच्या वाढत्या रुग्णांच्या बाबत चिंता व्यक्त करून आवश्यक त्या उपाय योजना करण्याची मागणी केली. आमदार पाटील यांनी इचलकरंजीच्या अधिकार्‍यांनी खरी माहिती मंत्र्यांसमोर सादर करा. शिरोळ तालुक्याला मैलामिश्रीत पाणी सोडू नका, असे सांगितले. कोल्हापूर येथील ७ बंधार्‍याबाबत दक्षता घेण्याचे आश्‍वासन आमदार महाडिक यांनी दिले. यावर बैठकीतच कदम यांनी संबंधित जबाबदार अधिकार्‍यांनी प्रतिज्ञापत्रावरच केलेल्या कारवाईची माहिती माझ्याकडे सादर करावी असे आदेश दिले. ग्रामीण भागासाठी २ कोटी रुपये नदी संवर्धनासाठी देत असून, आवश्यकतेनुसार प्रस्ताव सादर केल्यास निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन कदम यांनी दिले.

Story img Loader