कोल्हापूर : पत्र म्हणजे मनातील हळवा कोपरा .दिलासा, सुखाची ओंजळ, भावनांच्या संवेदना, आशीर्वाद, निरोप नि बरेच काही. हुरहूर, आनंद, आतुरता अशा वेगवेगळ्या भावनांचे कंगोरे असलेले पत्र पाठवण्यासाठी सोमवारी पोस्टमनांच्या बरोबरीने आणखी एका अवलियाने हे काम आनंदाने केले. पूर्ण खाकी गणवेश परिधान करून गळ्यात त्याच रंगाची पिशवी अडकवून टपालांचा बटवडा करायला जाणारी ती तरुण व्यक्ती म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक होते. मजल दरमजल करत कृष्णराजने आज घरोघरी पत्र, मनी ऑर्डर, एटीएम पाठवण्याचे काम करीत पोस्टाच्या कामाचा अनुभव घेतला. आणि ज्यांच्या घरी पत्र पोचले त्यांना ‘चिठ्ठी आई है’ पाहून वेगळाच आनंद झाला.
९ ऑक्टोंबर हा जागतिक टपाल दिन. तो कोल्हापुरातील पोस्ट कार्यालयात साजरा झाला. नेहमीच्या सरावा प्रमाणे पोस्टमननी आपले काम आजही इमान इतबारे पार पडले. पण त्यांच्या जोडीला आज आणखी एक तरुण व्यक्तिमत्व होते. ते म्हणजे कृष्णराज महाडिक. कृष्णराज हा खरतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेसिंग कारचा स्पर्धेक. आपण आज त्याने चक्क सायकलवर स्वार होत पत्रांचा बटवडा करायला सुरुवात केली. ‘पुलं’नी ‘पोस्टमन आणि पाऊस यावे तेव्हा येत नाहीत’ असे लिहले आहे. पण आज आपल्या घरी आलेला पोस्टमन हा खासदारपुत्र आहे नि तो वेळेवर पत्र घेऊन पोहचतो आहे हे पाहूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
हेही वाचा >>>ऊसाला ५ हजार रुपये दर द्यावा अन्यथा कारखान्यातील अंतराची अट काढावी; शेतकरी संघटनेच्या परिषदेत ठराव
गुलजारनी शब्दबद्ध केलेली ‘डाकिया डाक लाया’ अशी साद घालत पत्र देणारा हा तरुण पोस्टमन ‘पलकों की छांव में’ चित्रपटातील किशोर कुमारने गायलेल्या स्वच्छंदी गायकीचा अविष्कार प्रकटणारा होता. खरं तर पत्रांचा आपल्याकडे ऐतिहासिक ठेवा आहे. पंडित नेहरूंनी लाडक्या इंदिरेला लिहलेली पत्रे असो की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची बच्चे मंडळीसाठी लिहिलेली पत्रे असोत ती नेहमीच स्ममरणीय ठरली आहेत. तितकेच काय पण खत लिख दे सावरिया के नाम बाबू, मैने सनमको खत लिखा,संदेसे आते है अशा हिंदी आणि पत्रं तुझे ते येता अवचित लाली गाली खुलते नकळत अशा मराठी गाण्यांन अनेकांचे जगणे संगीतमय केले आहे. ते जगणे कसे असते हे कृष्णराजने अनुभवले आणि तो अनुभव इतरांपर्यंत पोहोचवला.