कोल्हापूर : इचलकरंजीच्या सुळकुड नळ पाणी योजनेला कागल मधील आमदार ,खासदार, मंत्र्यांश सर्व नेत्यांनी एकमुखाने विरोध दर्शवला आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीकरांनी कागलला पाणी नेण्यासाठी येण्याचे धाडस करू नये. सुळकुड  पाणी  योजना ही त्यांच्यासाठी काळा दगडावरची रेष ठरली आहे, अशा शब्दात पाणी मिळणार नाही असा इशाराच दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुळकुड नळ पाणी योजनेचे प्रतीक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही, असा उल्लेख करून याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेऊन काम केले जाईल असे स्पष्ट केले.

इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र त्याला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही सुळकुड योजनेला जोरदार विरोध पाहायला मिळाला.

इचलकरंजी येथील सुळकुड ही योजना रद्द करण्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या सोबत एक बैठक घेवू,असा उल्लेख करून मंत्री मुश्रीफ म्हणाले,ही योजना रद्द करण्या संदर्भात आदेश काढावे लागतील.त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण प्रयत्न करू.

पाऊस लांबल्यावर उसाला पाणी मिळाले नाही. ऊस उत्पनात घट झाली असल्याचे पुरावे आहेत. योजनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळं इचलकरंजीकरांनी सुळकूड मधून पाणी नेण्याऐवजी वारणा आणि कृष्णा नदींचा पर्यायी विचार करावा,असा सल्ला त्यांनी दिला.

या बैठकीत, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या. समरजीतसिंह घाटगे यांनी सुळकुड येथून पाणी नेण्याच्या योजनेवर मोठा आर्थिक निधी खर्च होणार आहे. त्यामुळं कृष्णा नदीतून पाणी नेल्यास योजनेवर होणारा निधी वाचणार आहे. आता जितके पाणी लागणार असे इचलकरंजीकर सांगत आहेत त्यापेक्षा कितीतरी जादा पाणी लागणार असल्याने भविष्यातील धोका ओळखून विरोध केला पाहिजे,असे घाटगे म्हणाले या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योजना रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही घाटगे यांनी बैठकीत सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders including mlas mps ministers in kagal oppose ichalkaranji water scheme zws