काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशीही दिसून आले. गेले पंधरावडाभर दिवसाआड बदलणाऱ्या राजकीय हालचालीने आजही नवे रूप धारण केल्याने गटबाजीचा नवा कोन पुढे आला. विद्यमान सदस्य महादेवराव महाडीक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना सर्वपक्षीय उमेदवारी असल्याचा दावा केला आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन्ही अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनीही अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कृतीने दाखवला आहे. गटबाजीला आवर घालतानाच राष्ट्रवादीचे सहकार्य मिळवणे हे सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेस पक्षातील चार इच्छुकांनी प्रयत्न जारी ठेवताना गटबाजीची कास धरली होती. आमदार महादेवराव महाडीक आणि सतेज पाटील, पी.एन.पाटील व प्रकाश आवाडे या चौघांनी मुंबईपासून नवी दिल्लीपर्यंत हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले होते. याचवेळी उमेदवारीसाठी गटाचे लॉिबगही सुरू होते. सतेज पाटील यांना बाजूला सारत महाडीक, पाटील व आवाडे यांनी एकोपा साधला. पाटील यांना उमेदवारी न देता ती तिघांपकी एका कोणाला तरी मिळावी यासाठी त्रिकुटाचे प्रयत्न सुरू राहिले. त्यासाठी वारंवार भेटीगाठीपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत म्हणणे पोहचवण्यापर्यंत हालचाली सुरू होत्या.
तथापि, शनिवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे एकत्रित व वैयक्तिक भूमिका मांडल्यानंतर वेगळेच चित्र पुढे आले. महाडीक यांना वगळून सतेज पाटील, पी.एन.पाटील व आवाडे हे एकत्रित प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयातून बाहेर पडल्याने गटबाजीचा व लॉिबगचाही नवा चेहरा पुढे आला. अखेर प्रदेश काँग्रेस समितीने उमेदवारीची माळ बुधवारी सतेज पाटील यांच्या गळ्यात घातली. त्यांचा अर्ज दाखल करताना उमेदवारीचा आग्रह सोडून पी.एन.पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी पाठराखण केली. पण याचवेळी उमेदवारीच्या स्पध्रेत राहिलेले प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केल्याने चच्रेत नवा रंग भरला गेला. अधिकृत उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाली असताना आणि उमेदवारी अर्जासोबत त्यांनी ए.बी. फॉर्म भरला असताना आवाडे यांचा दावा आश्चर्यकारक ठरला. तर हेच निमित्त शोधून उमेदवारीचा पत्ता कापला गेलेले महाडीक यांनी ज्याच्या पोटात दुखते त्यालाच ते कळते, असे म्हणत आवाडेंप्रती सहानुभूती ठेवण्याची खेळी केली. एकंदरीतच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी स्पर्धा करणाऱ्या चौघाही इच्छुकांनी वेळ पडेल आणि वारे वाहील तशी भूमिका घेत सोयीचे लॉिबग जारी ठेवले. अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असली तरी गटबाजीची स्थिती कायम असल्याने त्यावर मार्ग काढणे हे काँग्रेस पक्ष व उमेदवार सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

Story img Loader