लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावांत ग्रंथालये आहेत. आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावे, अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी गुरुवारी व्यक्त केली.

त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सुषमा शिंदे, विजय राजापुरे अपर्णा वाईकर, सचिन अडसूळ डॉ. सुशांत मगदूम, भीमराव पाटील, सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

खोत म्हणाले, मुलांच्या हातात पुस्तक येण्यासाठी पालकांच्या हातातील रिमोट बाजूला करणे आवश्यक आहे. जगण्याची समृद्धी खऱ्या अर्थाने पुस्तकात आहे. ग्रंथालयांनी खेड्यापाड्यात कुठेतरी चांगले लेखक वाचनातून तयार करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांनी, युवा पिढीने साहित्याकडे वळणे आवश्यक आहे. डिजिटल युगात इंटरनेटचा संदर्भ घेण्याचे कमी करून विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे संदर्भ मोठ्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती.

Story img Loader