अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी करीअर निवडीतील संभाव्य चुका टाळण्यासाठी जास्तीतजास्त विकल्पांची यादी विचारपूर्वक तयार करून ठेवावी, असे आवाहन डॉ. आर. व्ही. शेटकर यांनी केले. तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअिरग इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रमात डॉ. शेटकर बोलत होते.

प्रवेशातील टप्प्यांबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी एसएमएसचा योग्य पासवर्ड व मोबाइल नंबर नोंदवावा. पसंती क्रमांकामध्ये जास्त पर्याय उपलब्ध असल्यास ‘फ्लोट व स्लाईड’ या पर्यायांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी प्रा. आर. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य पी. व्ही. कडोले यांनी महाविद्यालयामध्ये होऊ घातलेल्या स्वायत्ततेची माहिती दिली. प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांनी प्रवेश घेतेवेळी महाविद्यालयाची गुणवत्ता, शिकविण्याची पद्धत व प्लेसमेंट याचा विचार करावा, असे सूचित केले. या उपक्रमाचा लाभ पाचशेहून अधिक विद्यार्थी व पालकांनी घेतला. उपक्रमाचे संयोजन प्रा. जे. एम. पाटील, प्रा. आर. एन. पाटील व डॉ. ए. के. घाटगे यांनी केले.