मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते, असा टोला त्यांनी महाआघाडीला लगावला. हे ५६ पक्ष एकत्र आलेत पण त्यांची नोंदणी तरी आहे का, असा सवाल त्यांनी केला. ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. भाजपा-शिवसेना युती फेव्हिकॉलची जोड आहे. त्यामुळे ती कधी तुटणार नाही. ही विचारांची युती आहे. ही हिंदुत्ववादाची युती आहे, असे ते म्हणाले.
महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज (रविवार) कोल्हापूर येथील तपोवन येथे फोडण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आदींसह भाजपा-शिवसेनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
देश चालविण्यासाठी ५६ पक्ष नाही, ५६ इंचाची छाती लागते.
नावात राष्ट्रवादी शब्द घालून राष्ट्रवादी होत नाही.
राष्ट्रवाद हा मनात असावा लागतो: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis pic.twitter.com/ntDORQElsR— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 24, 2019
फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेतला त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, अलीकडच्या काळात पोपटही बोलू लागला. बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा उरलेला नाही. आमचे कपडे उतरवणारा अजून जन्माला यायचा आहे. विधानसभा निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत त्यांचे कपडे उतरवले आहेत. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांनी त्यांची लंगोटही उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुर्यासारखे आहेत. त्यांच्याकडे पाहून थुंकले की ते आपल्या चेहऱ्यावर पडते.
ऊसासंदर्भात जितके निर्णय साखर सम्राटांच्या काळात घेतले गेले नाही, तितके निर्णय मोदीजींनी घेतले. हे विदर्भातील लोक पश्चिम महाराष्ट्राचे नुकसान करतील, असा अपप्रचार केला गेला, पण आज आकडेवारीसह विकास सिद्ध होतो आहे: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 24, 2019
शरद पवार यांच्यावरही फडणवीस यांनी टीका केली. राष्ट्रवादीच्या कॅप्टनने माघार घेतली. ते आता नॉनस्ट्रायकरवर खेळत आहेत. काँग्रेसने गरिबी हटाओचा नारा दिला. पण त्यांच्या नेत्यांचीच गरिबी हटली. तुमचे १५ वर्षांचे आकडे आणा, मी साडेचार वर्षांचे आकडे घेऊन येतो, असे आव्हान त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिला. विकासाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीने पैसे घशात घातले, असा आरोप त्यांनी केला.
भाजपाला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले. आम्ही इव्हेंट मॅनजेमेंट कंपनी आणि तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहात काय, असा सवाल त्यांनी केला. तसेच जनतेचा पैसा जनतेकडे सोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.