कोल्हापूर : निवडणूक म्हटले की उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांना दगदग, तणाव यातून जावे लागते. त्यातूनही काही क्षण बाजूला ठेवून मनासारखा घटक, प्रसंग दिसला की त्यात सामावून जायला आवडतेच. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील मधुरिमाराजे यांनी अशीच उसंत काढून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तर यानिमित्ताने कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा चंदगड तालुक्यातील ५ वर्षांपूर्वी आणि तेही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असताना नदीत पोहण्याचा प्रसंग यानिमित्ताने पुन्हा नजरेसमोर आला .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीच्या काळात अथक कार्यक्रम, दौरे सुरू असतात. त्याच्या वेळा पाळणे, तेथे भूमिका मांडणे याची म्हणून एक दगदग असते. पण त्यातूनही चार विरंगळ्याचे क्षण शोधले जातात. कोल्हापूरचे दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर हे राजकारणातून सवड काढून क्रिकेटची आवड जोपासत असत. त्यांचाच क्रीडा प्रेमाचा वारसा कन्या मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांनी जपला आहे. येथील मस्कुती तलाव परिसरात त्या प्रचाराला गेल्या असता तेथे क्रिकेटचे सामने सुरू होते. वेस्टर्न महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा असलेल्या मधुरिमाराजे यांना पित्याप्रमाणेच क्रिकेटची आवड आहे. त्यांनी लगोलग पदर खोचला नी हाती बॅट घेऊन फलंदाजी सुरू केली. राजकारणात फटकेबाजी करणाऱ्या मधुरिमाराजेंची निवडणुकीच्या व्यस्त चर्येतील हे अनोखे रूप पाहून क्रिकेटप्रेमींनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा : “मंत्रिपद गेलं, गाड्या गेल्या, उरलो एकटाच!”, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली सत्तांतराची खंत

आणि संभाजीराजेंचे नदी जलतरण

मागील लोकसभा निवडणुकी वेळी तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यात नदीत पोहण्याचा आनंद लुटल्याने चांगलीच चर्चा झाली होती. २०२९ साली एप्रिल महिन्याचा मध्य होता. हिरव्याकंच निसर्गाचे देणं लाभलेला तालुका म्हणजे चंदगड. कोल्हापूरचे दक्षिण टोक. एकीकडे गोवा दुसरीकडे बेळगाव. इथल्या निसर्गात काजू,फणस आंबे यांच्या विपुल. चंदगडी भाषा मराठीच्या गोडाव्यात भर घालणारी. अजूनही अस्सल ग्रामीण बाज पूर्ववत. असा हा तालुका. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा आवडता. आपले राजेपण विसरुन जनतेत एकरुप होऊन जात त्यांनी रयतेसमावेत थंडगार पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतल्याचा प्रसंग यानिमित्ताने पुन्हा नजरेसमोर आला. धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली. राजेंनी गाडी थांबवून पोहणाऱ्या मुलांकडे नजर फिरवली. त्यांनी अंगावरील कपडे काढले आणि सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही त्यांनी पाण्यात सूर मारला. हंजोल नदीत त्यांनी डुंबणे सुरू ठेवले. ते पाहून पोहणार्या मुलांनाही आनंद झाला. राजेंच्या समवेत पोहण्याचा आनंद मौजमजा करीत एकत्रित लुटला. संभाजीराजेही कडक उन्हाने भाजून निघाले होते. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून त्यांनी विरंगुळा मिळवण्या बरोबरच मुक्त जनतेसमवेत आनंद लुटला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhurimaraje chhatrapati played cricket whereas sambhajiraje chhatrapati enjoyed swimming css