कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघात उमेदवारीवरून सुरू असलेला महाविकास आघाडीतील गोंधळ सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षासाठी आणखी मानहाणीचा ठरला. सुरुवातीला उमेदवारीवरून गोंधळ, मग राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी. पुन्हा यातून नाराजी होत पक्षाच्या आमदार जयश्री जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देणे आणि यावर कळसाध्याय होत ऐनवेळी अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी पक्षाला न कळवताच माघार घेणे या साऱ्यांमुळे काँग्रेस पक्षासाठी कोल्हापुरातील आजचा दिवस मानहाणीचा ठरला.
या साऱ्यांबद्दल मधुरिमाराजे छत्रपती, तसेच त्यांचे सासरे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोणतेही कारण सांगण्यास नकार दिला. तर दुसरीकडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी या साऱ्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक लढवण्याची धमक नव्हती तर रिंगणात उतरलाच कशाला अशा शब्दात छत्रपती घराण्याबद्दल राग व्यक्त केला. दरम्यान या माघारी नाट्यानंतर लक्ष केंद्रित झालेले उमेदवारी कापलेले राजेश लाटकर हे सकाळी संपर्काबाहेर होते, समोर आल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे सांगितले. या साऱ्यांमुळे सुरुवातीपासून काँग्रेससाठी गोंधळाचा ठरलेला हा मतदारसंघ आज उमेदवारविना झाला आहे.
कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही अंतर्गत दोन्हीकडे उमेदवारीचा टोकदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपच्या प्रमुख चौघांवर मात करीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर त्यांनी इच्छुकांसमवेत पत्रकार परिषद घेत महायुती एकसंध असल्याचा संदेश दिला.
आणखी वाचा-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस काय भूमिका घेणार? सतेज पाटील म्हणाले, “आज आम्ही…”
याचवेळी काँग्रेसअंतर्गत संघर्षाचे नाट्य वेगवेगळी वळणे घेत होते. काँग्रेस पक्षाने तिसऱ्या यादीत राष्ट्रसेवा दलात काम केलेले, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले राजेश भरत लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यातून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेकीचा प्रकारही घडला. लाटकर यांना विरोध असल्याचे पत्रक २६ नगरसेवकांकडून जारी करण्यात आले. नगरसेवकांनी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. काँग्रेसने उमेदवारी बदलत ती मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांना दिली. या प्रक्रियेत विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची नाराजी पुढे आली. त्यांनी उमेदवार बदलल्याने पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला.
या गोंधळाला आज पुन्हा नाट्यपूर्ण वळण लागले. मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानकपणे माघार घेतल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला. माघारी बाबत खासदार शाहू महाराज यांनी मोघम स्पष्टीकरण केले आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी आज बोलण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे या एकूण प्रकारावरून संतप्त झाले. उमेदवारी मागे घेण्याच्या प्रकाराबद्दल त्यांनी शाहू महाराजांकडे बोलताना ‘हे बरोबर नाही, लढायचे नव्हते तर तसे सांगायचे होते’, अशा शब्दांत संतापाला वाट मोकळी करून दिली.
आणखी वाचा-कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू
हे नाट्य घडत असताना राजेश लाटकर सकाळपासूनच संपर्काबाहेर होते. चिन्ह वाटपाच्या निमित्ताने ते दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अपक्ष म्हणून लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसचे पाठबळ कोणाला, काँग्रेस लाटकर यांना पाठबळ देणार का, दिला तर तो कितपत स्वीकारला जाणार, या मतदारसंघाचे परिणाम अन्य मतदारसंघात कसे उमटणार अशा प्रश्नांची मालिकाच या निमित्ताने उपस्थित झाली आहे.