गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सोमवारी न्यायालयाने ९ ऑक्टोंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सरकारी अभिव्यक्त्यांनी आणखी दोन दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती नाकारली.
पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याला सांगली येथे अटक करण्यात आली होती. न्यायालयाने प्रथम त्याला ७ दिवसांची तर त्यानंतर २ दिवस आणि त्यानंतर २ दिवस अशी ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यामुळे सोमवारी पुन्हा गायकवाड याला प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी आर.डी.डांगे यांच्या समोर उभे करण्यात आले.
सरकारी अभिव्यक्ता चंद्रकांत बुधले यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की गायकवाड याच्याकडून मिळालेल्या मोबाइल व सिमकार्डच्या माध्यमातून आणखी तपास करावा लागणार आहे. अनंत चतुर्दशीमुळे पोलिसांना बंदोबस्ताचा अतिरिक्त तणाव असल्याने या प्रकरणाची चौकशी करता आली नाही.
बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सुनील पटवर्धन यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की आतापर्यंत सरकारी वकिलांकडून पोलिस कोठडी वाढवून मिळण्यासाठी तीच ती कारणे सांगितले गेली आहेत. तपास यंत्रणेला अद्याप कोणताही सबळ पुरावा हाती लागलेला नाही. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने गायकवाड याला ९ ऑक्टोंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
समीर गायकवाडला न्यायालयीन कोठडी
गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सोमवारी न्यायालयाने ९ ऑक्टोंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
Written by बबन मिंडे
First published on: 29-09-2015 at 02:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magistrate custody to sameer gaikwad