करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या सानिध्यात असलेल्या येथील श्री महालक्ष्मी सहकारी बँकेच्या पंचवार्षकि संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोमवारी महालक्ष्मी सत्तारूढ जुन्या आघाडीने विजय मिळविला. त्यांना आवाहन देणाऱ्या महालक्ष्मी आघाडीला मोठय़ा पराभवाला तोंड द्यावे लागले.
महालक्ष्मी सहकारी बँकेसाठी रविवारी कोल्हापूर, नृसिंहवाडी व पुणे या तीन ठिकाणी मतदान झाले होते. कडक उन्हामुळे मतदानाचे प्रमाण अवघे ३८ टक्के होते. विनोद डिग्रजकर, महेश धर्माधिकारी, अॅड. राजेंद्र किंकर, डॉ. लक्ष्मण नसिराबादकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडी आणि भालचंद्र आष्टेकर, अरुण आराध्ये, महेश गोटिखडकर, नंदकुमार मराठे यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी आघाडी यांच्यात सामना रंगला होता. आष्टेकर यांच्या आघाडीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी पािठबा देऊनही त्याचा काहीच फायदा झाला नाही. आष्टेकर व डोईफोडे यांनी जुन्या आघाडीतून बाहेर पडून विरोधात आघाडी उभारली, पण ती सभासदांनी नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. २३ हजार ७०० मतदारांपकी ९०९७ मतदान केले होते. सोमवारी कसबा बावडा येथील जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी इमारतीमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. ६० टेबलवर १४० कर्मचाऱ्यांनी मतमोजणीचे काम केले. निकाल जाहीर करण्यात आला. तेव्हा सत्तारूढ आघाडीने विजय मिळविल्याचे स्पष्ट झाले. विजयी उमदेवार याप्रमाणे- विनोद डिग्रजकर, महेश धर्माधिकारी, अॅड. राजेंद्र किंकर, डॉ. लक्ष्मण नसिराबादकर, संदीप कुलकर्णी, नरेंद्र खासबारदार, अॅड. रघुनाथ लाटकर, अॅड. रवी शिराळकर, प्रकाश सांगलीकर, उदय महेकर, अॅड. दिलीप मुंडरंगी, केदार हसबनीस, श्रीकांत हेल्रेकर, नितीन डोईफोडे, प्रशांत कासार, पद्मजा आपटे, मेघा जोशी.