कळंबा कारागृहातील कैदी लाडू बनविणार
करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीच्या भक्तांना लाडू प्रसाद सोमवारपासून नियमितपणे देण्यात येणार आहे, मात्र लाडूच्या दरात तीन रुपये वाढ केली असून, तो आता भक्तांना आठ रुपयांना मिळणार आहे. कळंबा कारागृहातील कैद्यांकडून हे लाडू बनवून घेतले जाणार आहेत. त्यांना त्याचा मोबदलाही मिळणार आहे. कैद्यांकडून लाडू बनवून ते भक्तांना देण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. मात्र, बजरंग दलाने कैद्यांकडून लाडू बनवून प्रसादरूपात भक्तांना देण्यास विरोध दर्शवला होता. शनिवारी तो काहीअंशी मावळला असला तरी या प्रयोगाची उपयुक्तता दिसून आल्यावर भाष्य करणार असल्याचे शहराध्यक्ष महेश उरसळ यांनी सांगितले.
गेले काही महिने महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना प्रसादरूपाने काय द्यायचे यावरून वाद होता. जिल्हाधिकाऱ्यांनी भक्तांना लाडू प्रसाद देण्याचा विचार व्यक्त केला होता. तर त्यावर बजरंग दलाने पारंपरिक खडीसाखर, फुटाणे देण्याची मागणी करताना कैद्यांकडून लाडू प्रसाद भक्तांना देण्यास विरोध दर्शवला होता. अखेरीस जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष अमित सनी यांनी लाडू प्रसाद म्हणून देण्याचे निश्चित केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती त्याची कार्यवाही करणार आहे. लाडू दरात ३ रुपये वाढ करण्यात आली आहे .
भाविकांना लाडू प्रसाद नियमितपणे मिळत नव्हता. र्निजतुक व व्यवस्थित असा लाडू प्रसाद मिळत नसल्याच्या तक्रारी भाविकांकडून वारंवार होत राहिल्या. देवस्थान समितीच्या बठकीत हा प्रसाद नियमित पुरविण्यासाठी कळंबा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेला लाडू प्रसाद घेण्याचे ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी सनी यांनी कारागृह प्रशासनाकडे लाडू पुरविण्याबाबत विचारणा केली. त्यानुसार कारागृह प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला. लाडू प्रसाद पुरविण्यासाठी कारागृहाच्या प्रशासनाकडे मागणी नोंदविण्यात आली. कारागृह प्रशासन आता सोमवारपासून देवस्थान समितीकडे मागणीप्रमाणे लाडू प्रसाद पॅकिंगसह सात रुपये प्रतिनग इतक्या दराने पुरविणार आहे; तर देवस्थान आठ रुपये प्रतिनग याप्रमाणे भक्तांना हा प्रसाद विकणार आहे. यापूर्वी हा लाडू प्रसाद पाच रुपये प्रतिनगाप्रमाणे मिळत होता. आता यात तीन रुपयांची वाढ झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा