कोल्हापूर : जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम पुन्हा आणण्याची धमक कोणातच नाही. राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजी येथे दिले.
इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे राहुल आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर व अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ झंझावात सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी शहा बोलत होते.
मागील ६० वर्षांत काँग्रेस सरकारने देशाची वाताहात केली. राम मंदिर असो, जम्मू काश्मिरमधील ३७० कलम हटविणे असो, प्रत्येक गोष्टीला काँग्रेसने खो घातला. तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृवाखाली ही कामे करतानाच विकासकामांची मालिका उभारली, असा उल्लेख करून शहा म्हणाले, की महाराष्ट्राच्या निवडणुकीत पुढील पाच वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचे की औरंगजेबाच्या विचाराने जायचे हे ठरवा. जगामध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदी मंडळी विरोध करीत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, गुंतवणूक वाढत असताना महाविकास आघाडीकडून दिशाभूल केली जात आहे. महायुतीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना १५ हजार रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये, मोफत आरोग्य योजना १० लाखापर्यंत पुरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा >>> चळवळींनी प्रवाहातील राजकारणाशी जोडून घेणे आवश्यक – जालिंदर पाटील
खासदार धैर्यशील माने यांनी, इचलकरंजीकरांनी खासदार निवडला असून आता नाळ जनतेशी जोडलेला राहुल आवाडे सारखा आमदार शहरवासीय नक्कीच विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राहुल आवाडे यांची भाषणे झाली.
धागा वस्त्रोद्योगाशी
वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क उभारणीसह कापूस निर्मितीपासून ते निर्यातीपर्यंतची समग्र शृंखला कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यात उभारली जाईल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.