राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल मनसेला मान्य नाही. उमेदवारांचे म्हणणे राज ठाकरे यांनी ऐकून घेतले आहे पण त्यांनी अद्याप आपले मत व्यक्त केलेले नाही. ते बोलतील तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रकाशझोत पडेल, असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी येथे बुधवारी व्यक्त केले. महायुतीने मनसेची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा >>> आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा
राज्यभरात १२८ उमेदवार रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने अबोला धरला होता. आज महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यावर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चुप्पी तोडली. ते म्हणाले, जे आमदार कोणाला भेटत नव्हते, ते लाख मतांनी निवडून आले. मी खात्रीने सांगतो मतयंत्राशिवाय ही गोष्ट अशक्य होती. भाजपाचा विजय झाल्याने अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे. अमेरिकेसारख्या देशात मतपत्रिकेवर निवडणुका होत असतील तर इथे का नको? मनसे २०१९ सालीही हेच म्हणत राहिली. आता खात्रीने सांगतो की, आमची फसवणूक झाली आहे. लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला.