कोल्हापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींचे आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. राज्यव्यापी यात्रेनिमित्त येथे सभेत पवार बोलत होते.
ते म्हणाले, की सरकार अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत का करत नाही? आम्ही तुमच्याकडे भीक मागतो आहोत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विद्यमान सरकार हे शेतकरी विरोधी आहे. लाखांचा पोशिंदा सुखी नाही, आया—बहिणी सुरक्षित नाहीत. कुपोषणाने डोके वर काढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे हे दळभद्री सरकार उलथवून टाका,असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केवळ पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची घोर निराशा झाली आहे. सत्तेत बदल निश्चित असून शरद पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
साडेचार वर्षांत साडेचार लाख कोटीचे कर्ज या राज्यावर केले आहे आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत पाच लाख कोटीपर्यंत जाईल. एवढा कर्जाचा डोंगर या भाजपवाल्यांनी उभा केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींचे आहे असा आरोपही पवार यांनी केला.