कोल्हापूर : राज्यात कृषिविषयक विविध योजना, त्यांचे नियम, लाभ शेतकऱ्यांना सुलभपणे मिळावेत यासाठी मार्गदर्शक असे एकच ‘ॲप’ आणि ‘पोर्टल’ आता राज्य शासनाकडून तयार केले जाणार आहे. ‘एक खिडकी योजने’च्या धर्तीवरील हे ‘ॲप’ आणि संकेतस्थळ शेतकऱ्यांना या विषयातील सर्व माहिती आणि उपयोग एकाच ठिकाणी मिळवून देण्याचे काम करेल. यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून हे ‘ॲप’ बनवण्यासाठी कृषी विभागाने नुकतीच एका समितीची स्थापना केली आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती आणि नोंदणी, अर्जासाठी सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संगणक प्रणाली, महाॲग्री-डीबीटी, ई – परवाना आदी विविध संकेतस्थळ आणि ‘ॲप’ वापरली जातात. मात्र प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र पद्धती, ‘ॲप’ आणि संकेतस्थळाच्या वापराने शेतकऱ्यांना याचा वापर आणि उपयोग करणे अवघड जाते. यामुळे या योजनांचा फायदा घेणेही त्यांना अवघड जाते. या पार्श्वभूमीवर आता ‘एक खिडकी योजने’च्या धर्तीवरील एकच ‘ॲप’ आणि संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे असे ॲप’ आणि संकेतस्थळ शेतकऱ्यांना या विषयातील सर्व माहिती, अर्ज, नोंद आणि उपयोग एकाच ठिकाणी मिळवून देण्याचे काम करेल.

शेतकऱ्यांना दैनंदिन कृषी व आनुषंगिक कामे करत असताना विविध प्रश्न व समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचे निवारण या ‘ॲप’ आणि संकेतस्थळाद्वारे एका ठिकाणी केले जाईल, कृषिविषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध होतील, योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आदी बाबींकरता एकाच ठिकाणी सुविधा मिळेल, असा यामागचा होतू आहे. या कामासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली असून ते आपला अहवाल देणार आहेत.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक शेतकरी ‘ॲप’ आणि पोर्टल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी योजना गतीने राबवण्यात येतील. याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, प्रशासन गतिमान होईल.

जालंदर पांगरे, जिल्हा कृषी अधिकारी, कोल्हापूर</strong>

महा-डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी उपुयक्त आहे. मात्र त्यातील भाग्यवान सोडत पद्धतीमुळे (लॉटरी) लाभार्थ्यांचे अकारण अर्ज वाढत जाऊन गुंतागुंत होते. शिवाय प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र ‘ॲप’ करण्याऐवजी असे एकच ‘ॲप’, संकेतस्थळ केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

नंदकुमार साळुंखे, टोप, कृषिमित्र पुरस्कार विजेते

Story img Loader