C P Radhakrishnan : कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम आज (१७ जानेवारी) विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी विविध विषयांवर भाष्य करत पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाचं मार्गदर्शन केलं. तसेच सी.पी.राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर भाष्य केलं. शिवरायांच्या शौर्यामुळे आपण सर्वजण आहोत. ते फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे राजे होते असं सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सी.पी.राधाकृष्णन यांनी याच कार्यक्रमात बोलताना एक महत्वाचं विधान केलं. “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझं नाव सी.पी.राधाकृष्णनन नसतं, वेगळं काहीतरी असतं”, असं सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं. तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आणि आदर्श घेऊन मार्गक्रमण केलं पाहिजे असं म्हणत दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे सी.पी.राधाकृष्णन यांनी कौतुक केलं.

सी.पी.राधाकृष्णन यांनी पुढ असंही म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांनी अनेक परदेशी आक्रमणाच्या विरोधात लढा दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे राजे नव्हे तर देशाचे राजे होते. आज त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातील दिक्षांत समारंभात मला सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. तसेच शिक्षकांचे आणि पालकांचे देखील अभिनंदन करतो”, असं राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यावेळी म्हणाले.

“खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा विद्यापीठाच्या परिसरात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि त्यांच्या जीवनाची आठवण हा पुतळा करून देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्लोर, तंजावर, सेनजी आणि तामिळनाडूमधील काही ठिकाणी भेट दिली होती हे ऐकून देखील समाधान वाटतं”, असंही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor c p radhakrishnan on chhatrapati shivaji maharaj and shivaji university convocation in kolhapur gkt