कोल्हापूर : कन्नड – मराठी उफाळलेला भाषावाद आणि त्याला दिले गेलेले आव्हान – प्रति आव्हान यामुळे गेले पाच दिवस बंद असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक आंतरराज्य एसटी वाहतुकीचा फटका प्रवाशांना बसला. दरम्यान बुधवारी सायंकाळी उशीरा ही बससेवा सुरू करण्यात आली.
बेळगावजवळील सुळेभावी येथे बसमध्ये प्रवासी आणि वाहकाची वादावादी झाली. परिणामी चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटीला कन्नड भाषकांनी काळे फसले. त्याची प्रतिक्रिया म्हणून कोल्हापुरात कर्नाटकच्या बस रोखण्यात येऊन त्यावर भगवे झेंडे लावण्यात आले. या वादाची दखल घेऊन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटककडे जाणाऱ्या एसटी बस थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेले पाच दिवस लाल परी कर्नाटकात जाऊ शकली नाही. तर, कर्नाटक शासनानेही महाराष्ट्रात एसटी न पाठवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकडेसुद्धा बस जागीच उभ्या आहेत. परिणामी महाराष्ट्र – कर्नाटक या दोन्ही राज्यांतील एसटी वाहतूक बंद झाली आहे. प्रवाशांना खासगी वाहनांचा, वडापचा आश्रय घ्यावा लागला आहे. तेथे दुप्पट, तिप्पट दर आकारला जात आहे. दरम्यान, उभय राज्यांतही बससेवा सुरू होण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व बेळगावचे जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांच्यामध्ये चर्चा झाल्यावर बुधवारी सायंकाळी उशीरा ही बससेवा सुरू करण्यात आली.