लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : अखेरच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत शिंदेसेनेचे धैर्यशील माने १४ हजार ७२३ मतांनी विजय झाले. त्यांनी १५ व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला. एकला चलो रे अशी भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

हातकणगले लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत ही शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यामध्ये झाली. तिन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असल्याने निकाल कसा असणार याची कमालीचे उत्सुकता होती.

आणखी वाचा-कोल्हापुरात कार्यकर्ते गुलाल उधळण्यास आतुर; शाहू महाराजांचे पोस्टर झळकले, महायुतीची राजतिलकाची तयारी

आज येथील राजाराम तलावा जवळील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. सु रुवातीपासूनच मतदानामध्ये मतदानाचे आकडे कुतूहल वाढवणारे ठरले . पहिल्या फेरीमध्ये सत्यजित पाटील यांना २०,९२३ तर धैर्यशील माने यांना २०८५७ मते मिळाली. या दोघांच्या तुलनेत राजू शेट्टी यांना ११,३१२ इतकी मते मिळाली. त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीमध्ये सुमारे एक ते दीड हजार मते पाटील यांना मिळत गेली. मात्र मताधिक्यामध्ये फार मोठी वाढ नव्हती.पंधराव्या फेरी अखेरपर्यंत त्यांनी आपली आघाडी कायम टिकवली.

त्यानंतर मात्र मतमोजणीला कलाटणी मिळाली. १६ व्या फेरीपासून धैर्यशील माने यांच्या मतांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होऊ लागली. विशेषतः इचलकरंजी , हातकणंगले मतदारसंघात त्यांना चांगली पसंती मिळाल्याचे आकडेवारी मधून दिसत होते. अखेर २४ व्या फेरी मध्ये माने यांनी १४ हजार ७२३ मताधिक्य घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केला.

आणखी वाचा-रायगडावरील शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी; संयोगिता राजे छत्रपतींनी घेतला आढावा

दुसऱ्यांदा खासदार प्रथा कायम

हातकणंगले मतदार संघात सलग पाच वेळा काँग्रेसचे बाळासाहेब माने खासदार होते. त्यांच्या नंतर कल्लाप्पांना आवाडे, निवेदिता माने व राजू शेट्टी हे खासदार झाले. या तिघांनीही सलग दोन वेळा निवडून येण्याची कामगिरी केली होती. तीच प्रथा धैर्यशील माने यांच्या विजयानंतर कायम राहिली.

आनंदाला उधान

सोळाव्या फेरीपासून धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्यानंतर महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्याआधी सत्यजित पाटील यांनी आघाडी कायम ठेवली असल्याने महाविकास आघाडी कडून जल्लोष सुरू होता. गुलाबाची उधळण केली जात होती. परंतु अखेर या काटाजोड लढतील धैर्यशील माने यांनी विजय निश्चित केल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात आनंदाला उधाण आले. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी , मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष केला जात होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election result 2024 dhairyasheel manes victory in the thrilling counting of votes mrj
Show comments