आयपीएल स्पर्धा सध्या जोशात सुरु आहे. अशात कोल्हापुरात अत्यंत क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमी माणसाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना होता. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद झाला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा सीएसकेचा फॅन असलेल्या एका क्रिकेटप्रेमी रसिकाने केली. त्यानंतर त्यांचं डोकं फोडण्यात आलं. उपचारांदरम्यान त्या फॅनचा मृत्यू झाला आहे. बंडोपंत बापूसो तिबिले हणमंतवाडी असं मृत्यू झालेल्या कोल्हापूरकराचं नाव आहे.
तिबिले यांचा मृत्यू झाल्याने त्यांना मारहाण करणाऱ्या बळवंत झांजगे सागर झांजगे या दोघांनाही करवीर पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएल सामन्यांचे अनेक क्रिकेट रसिक असतात. मात्र अशा पद्धतीने भांडण आणि वाद झाल्याने एका रसिकाचा बळी गेला आहे. कोल्हापुरातली ही घटना आहे.
रोहित बाद झाल्याने आनंद व्यक्त केला होता
तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्सचा सामना झाला. त्यावेळी चेन्नई टीमचे चाहते असलेल्या बंडोपंत तिबिलेनी आनंद व्यक्त केला आणि आता मुंबई कशी जिंकणार? हे विचारलं. त्यानंतर बळवंत आणि सागर या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचं डोकं फोडलं. २७ मार्चला रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. ज्यात तिबिले गंभीर जखमी झाले. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांससह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना चांगलाच राग आला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हणत आनंद व्यक्त केला. यावेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तिबिले यांच्या डोक्याला मार लागला अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलिसही चक्रावून गेले.