|| दयानंद लिपारे
दोन हजार कोटींची उलाढाल असलेल्या राज्यातील सर्वात मोठा सहकार तत्त्वावरील गोकुळ दूध संघ आपले अस्तित्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सत्तारूढ गटाने पावले टाकण्यास सुरुवात केली असताना विरोधकांनी विरोधाचे हत्यार उपसले आहे. त्याची तीव्रता इतकी की,पक्षापक्षांतर्गत यादवी माजली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा प्रमुख पक्षांतील नेते परस्परांवर वाग्बाण सोडत आहेत. लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय ऐक्य पाहायला मिळत असताना गोकुळच्या मलईदार राजकारणामुळे पक्षोपक्षांत वादाची उकळी निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात सहकाराला विशेष महत्त्व आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाने, सूतगिरणी, शेतकरी संघ, बाजार समिती आदी संस्थांवर ताबा असला की स्थानिक निवडणुकीचा फड मारणे सोपे बनते असा एक निष्कर्ष आहे. त्यात गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) सारखी मलईदार संस्थेवर प्रभुसत्ता असेल तर जिल्ह्य़ाच्या राजकारणाचे सूत्रधार बनणे सोपे होते. त्यामुळे गोकुळवर आपली पकड कायम राहावी यासाठी जिवाचा आटापिटा केला जातो. आताही गोकुळवरील नियंत्रण कायम राहण्यासाठी संघाच्या कारभाऱ्यांनी संस्था बहुराज्यीय करण्याचा घाट घातला आहे. त्यावरून विरोधकांनी संघर्षांची मोट आवळली आहे. हा विरोध होत असतानाच त्यामध्ये पक्षापक्षांमध्ये कलहाचा कलगीतुरा रंगू लागला आहे. निवडणुकींच्या तोंडावर पक्षीय ऐक्य असल्याचे दाखवण्याची सर्व पक्षांत अहमहमिका लागली असताना हे ऐक्यच तोंडावर पडताना दिसू लागले आहे.
राष्ट्रवादीमध्ये दुभंग
महादेवराव महाडिक यांनी हल्लीच आपले राजकारण भाजपला पूरक असल्याचे म्हटले आहे. सत्तेला दंडवत करण्याचा त्याचा प्रघात पाहता त्यात नवे काही नाही. युतीच्या सत्ताकाळात त्यांनी सेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते आणि आघाडीचा सत्तासूर्य उगवल्यावर काँग्रेसच्या वर्तुळातील संचार कायम ठेवला होता. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताकारणात चुलते महादेवराव महाडिक यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. काकांनी पुतण्याला पुन्हा लोकसभेला निवडून आणण्याचा निर्धार जाहीरपणे केल्याने खासदारांची ही भूमिका स्वाभाविक. खासदारानी महाडिक यांची बाजू घेतली असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या बहुराज्यचा मुद्दा घेऊन महाडिक यांना विरोध केला आहे. मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे गतनिवडणुकीत महाडिक यांना गोकुळचे संस्थान राखणे शक्य झाले होते. आधीच खासदार-आमदार यांचा सूर जुळत नाही, तशात या नव्या वादाने राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत दुभंग निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या एकोप्यात दुही
जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसमधील नेत्यांची एकवाक्यता प्रदीर्घ काळानंतर पाहायला मिळाली. हातात हात घातलेले नेते आता गोकुळच्या बहुराज्य निमित्ताने बेकीच्या मार्गावर आले आहेत. गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे एकहाती वर्चस्व. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांची साथ मिळत असल्याने महाडिक यांना हे शक्य होते. त्यातून गोकुळ काँग्रेसच्या ताब्यात असल्याचा संदेशही जातो. मात्र, महाडिक यांचे कट्टर विरोधक आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या अर्थपूर्ण कारभारावर सातत्याने प्रश्न विचाराने सुरू ठेवले आहे. आता बहुराज्य विषयावरून काँग्रेसमध्ये पाटील विरुद्ध पाटील असा सामना उभा ठाकला आहे. पी. एन. पाटील यांनी महाडिक यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऐक्याच्या माळेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील अन्य नेत्यांची भूमिका कोणाच्या बाजूने उभे राहण्याची आहे, यावर निवडणुकीचे राजकारण रंग धारण करणार आहे.
शिवसेनेत दुही, स्वाभिमानी आक्रमक
गोकुळचे पक्षीय राजकारण तापले असले तरी त्यामध्ये महत्त्व आहे ते सहकारी दूध संस्था कोणाच्या नियंत्रणात आहे अशा नेत्यांनाच. भाजपकडे अशा संस्था मोजक्याच, पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी महाडिक यांनी जमवून तर घेतलेच, पण दादांनी शिफारस केलेल्या भाजपच्या एका जुन्या नि एका नव्या कार्यकर्त्यांला गोकुळमध्ये स्वीकृत संचालक केले. यामुळे भाजपचे पाठबळ महाडिक यांच्या बाजूने राहणार हे नक्की. याच वेळी भाजपपासून दुरावलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी महाडिकांशी असलेले मधुर संबंध तोडून त्यांच्या विरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. शेट्टी यांच्या विरोधात काही स्थानिक कार्यकर्त्यांनी बंड केले असून त्यांना पराभूत करण्याचा निर्धार त्यांना केला आहे. त्यांचा बोलविता धनी महाडिक हे असल्याचे स्वाभिमानीतून सांगितले जाते. त्यातूनच शेट्टी यांनी महाडिक यांच्या विरोधात आता दंड थोपटले आहेत. शिवसेनेत मात्र या मुद्दावरून दुही आहे. गोकुळचे ज्येष्ठ संचालक, माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी गोकुळच्या कारभारात महाडिक यांच्या समवेत आणि विधानसभा निवडणुकीत पुतणे, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजे नरके हे गोकुळामध्ये महाडिक, पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून असतील, पण विधानसभेला पी. एन. पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरतील. पाटील यांच्याशी कडवा संघर्ष करावा लागणार असल्याने आमदार नरके यांनी त्यांच्या विरोधकांसमवेत राहण्याची भूमिका घेतली आहे. याच वेळी गोकुळचे संचालकपद घरात असल्याने शाहूवाडीचे सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांची पाठराखण करायचे ठरवले आहे. आगामी निवडणुकीसाठी सामोरे जात असताना सर्वच पक्षांत ऐक्य असल्याचे दाखवले जात असताना गोकुळच्या बहुराज्यच्या निमित्ताने बहुपक्षात बहुरंगी नाटय़ रंगात आले असून त्यातील पात्र विभागणीचे परिणाम निवडणुकीत उट्टे काढण्यासाठी केला जाणार हेही तितकेच खरे.