कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सुरुवातीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीच्या ५ उमेदवारांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. तर २ जागेवर विरोधी गटाला स्थान मिळालेले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची विजयाची घोडदौड सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने सर्वसाधारण सेवा सोसायटी, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, विभक्त जाती- भटक्या प्रतिनिधीमधून आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीने १८ जागांपैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गट आणि भाजपचे एक उमेदवार आणि अपक्षमधून एका उमेदवाराने विजयाचा झेंडा रोवला आहे.
सत्ताधारी आघाडीची प्रचाराची धुरा शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, सतेज पाटील, विनय कोरे हे आमदार, माजी आमदार के. पी. पाटील यांच्याकडे होती.विरोधकांच्या शिवशाहू आघाडीचे नेतृत्व खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे तसेच सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर हे माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केले होते.