महापालिका निवडणुकीचा आखाडा रंगण्यापूर्वीच काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल कांबळे, भाजपचे उमेदवार सचिन जाधव आदी प्रमुख उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे छाननी प्रकियेमध्ये अवैध ठरली. महानगरपालिका निवडणुकीसाठी छाननीत १९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे भरण्याची मुदत मंगळवारी संपली होती. बुधवारी ७ विभागीय कार्यालयांमध्ये छाननी प्रक्रिया झाली. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे सुपुत्र नगरसेवक सचिन चव्हाण यांचा जातीचा दाखला याही निवडणुकीत वादाचा केंद्रिबदू ठरला. ते नगरसेवक असतानाही त्यांच्या विरोधकांनी त्यांचा जातीचा दाखला बोगस असल्याची तक्रार केली होती. आज छाननी प्रक्रियेवेळी याच मुद्यावर आक्षेप घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे चव्हाण संतप्त झाले. त्यांनी अधिका-यांना उद्देशून अपशब्द वापरले, तसेच अर्ज अवैध ठरविण्याच्या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील यांनाही जोरदार धक्का बसला. शिवाजी उद्यमनगर प्रभागातून निवडणूक उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेत दाखल केला नाही म्हणून पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांच्या विरोधकांनी हरकत घेतली होती. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटील यांचा अर्ज अवैध ठरविला.  पाटील यांचे बंधू सुनील पाटील यांचाही अर्ज अवैध ठरला. त्यामुळे या प्रभागातून भाजपचे उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय भाजपचे सचिन जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कांबळे यांचेही अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या पक्षांना तो धक्का ठरला.

Story img Loader