लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : मराठा आरक्षण, नोकरी, सारथी संदर्भातील सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असा पुनरुच्चार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी येथे केला. यापूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत त्यांनी असेच विधान केले होते.
सारथी संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी,तसेच पीएचडी नोंदणी दिनांक पासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावे, आदी मागणीसाठी अधिछात्रवृत्ती विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष प्रा. संभाजी खोत, प्रा. सौरव पवार, प्रा. अभय गायकवाड, प्रियांका पाटील सहभागी झाले आहेत. आज या आंदोलकांची संभाजीराजे यांनी भेट घेतली असताना आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. त्यावर समाजाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असे विधान पुन्हा एकदा संभाजीराजे यांनी केले. या कामाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आणखी वाचा-…म्हणून राजू शेट्टींसारखे नेते राहिले पाहिजेत – हसन मुश्रीफ
सतेज पाटील प्रयत्नशील
मराठा समाजाला नसलेले आरक्षण, कोणत्याही शैक्षणिक सवलती आणि मराठा समाजाची संख्या लक्षात घेऊन सारथीच्या पुढील बॅचपासून सरसकट शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय लागू करावा. याबाबत मी सरकारकडे आग्रह धरेन, अशी ग्वाही विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सारथीच्या साखळी उपोषण ठिकाणी भेट देऊन मराठा समाजातील पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना दिली.