कोल्हापूर : इचलकरंजी येथे दुचाकीस्वार आणि विद्युत खांबाला धडक देऊन भरधाव वेगाने जाणार्‍या स्विफ्ट कारचा पोलिसांनी सोमवारी दुपारी चित्रपटाला शोभेल असा तीन किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करत कारसह चालकाला ताब्यात घेतले. भरधाव जाणारी स्विफ्ट आणि पाठलाग करणारी पोलिस गाडी यामुळे स्टेशन रोडवर जणू चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे की काय असे काही क्षण सर्वांनाच वाटले. पण वस्तु:स्थिती समजल्यानंतर कारचालकाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या कारचालकास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकी व कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत समजलेली माहिती अशी, सोमवारी दुपारच्या सुमारास स्टेशन रोडवरुन एक स्विफ्ट कार अत्यंत वेगाने निघाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या कारने रस्त्यावर जाणार्‍या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर न थांबता कारचालक सुसाट निघाल्याने खळबळ माजली. त्याचवेळी त्याच रस्त्यावरुन निघालेल्या पोलिस गाडीने अपघात पाहून त्या कारचा पाठलाग सुरु केला. पोलिस गाडी पाहताच कार चालकाने आणखीन वेग वाढविला. त्यानंतर कारचालकाने अचानकपणे जवाहनगरकडे कार वळवली. आणि काही अंतर गेल्यानंतर पुन्हा स्टेशन रोडवर आला. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत हा पाठलाग सुरु होता. अखेर कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची पंचगंगा कारखाना परिसरात एका विद्युत खांबला धडकली व थांबली आणि पोलिसांनी तात्काळ त्या कारचालकाला ताब्यात घेतले.

आणखी वाचा-महापूर प्रश्नी ७ जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन

यावेळी घटनास्थळी नागरकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी चारचाकीसह चालकाला थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. धडक दिलेल्या दुचाकीचे नुकसान झाले असून संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते. कारमध्ये एक बिअरची बाटली तसेच स्नॅक आढळून आले असून चालकाच्या बाजूलाच मद्याची बाटली असल्यामुळे कदाचित चालक मद्यपान करत वाहन चालवत होता, असे समजते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man hits motorcyclist and electric pole in ichalkaranji fleeing motorist caught in thrilling chase mrj
Show comments