|| दयानंद लिपारे
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला असताना आता या मुद्दय़ावर स्वार होऊन राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न उघडपणे सुरू झाला आहे. त्यासाठी कोल्हापुरात मराठा राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीमध्ये या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली जाणार असली तरी त्यावरून वादाचे फटाके आतापासूनच वाजू लागले आहेत. असंतोष खदखदत असलेला मराठा समाज या राजकीय पक्षाच्या झेंडय़ाखाली एकवटला जाण्याची भीती राजकीय पक्षांना आहे. तर कोणा एका विशिष्ट-जातीधर्माच्या नावाखाली राजकीय पक्ष अस्तित्वात येऊ शकत नसल्याचा आजवरचा इतिहास असल्याचे सांगत हा केवळ बुडबुडा ठरेल, असाही प्रतिवाद केला जात आहे. विरोधकांनी तर हे भाजपचे पिल्लू असल्याची टीका करण्यास सुरुवात केली आहे. हे सारे कंगोरे पाहता या पक्षाचा झेंडा किती काळ फडकत राहणार, त्याचे भवितव्य कितपत उज्ज्वल राहणार यावरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासह अनेक प्रश्न गंभीर झाले आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी ‘एक मराठा ..लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा समाजाच्या भावनांना हात घालणारा हा विषय तापत चालला आहे. याचे नेतृत्व केल्याने समाजात लोकप्रियता मिळवणे सहजसोपे असल्याचे राजकीय क्षेत्रातील चाणाक्षांनी हेरले आहे. त्यामुळे या लाटेवर राजकीय स्वार होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच कोल्हापुरात मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या एका मेळाव्यात घेण्यात आला.
मराठा समाजाचे प्रश्न धसास लावण्यासाठी अशा राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले. गेली दोन दशके हे प्रश्न प्रलंबित आहेत. ते कोणत्याच राजकीय पक्षांनी ते सोडवले नाहीत. त्यामुळे राजकीय पक्ष स्थापन करून त्याचा पाठपुरावा करून ते तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या पक्षाचे संकल्पक सुरेश पाटील यांची भूमिका आहे. मात्र पाटील यांच्या या संकल्पनेला राजकीय पातळीवर कितपत यश मिळणार या विषयी मतप्रवाह आहेत. मराठा समाजात निर्माण झालेला असंतोष पाहता हा समाज मोठय़ा संख्येने आपल्याच समाजाच्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेईल अशी अटकळ बांधली जात आहे. विशेषत: मराठा तरुण या राजकीय पक्षात ओढला गेला तर प्रस्थापित पक्षांची मोठी कोंडी होणार आहे. एमआयएम पक्षाने ज्याप्रमाणे मुस्लीम समाजाला साद घालत लोकप्रतिनिधी निवडून आणण्याबरोबरच देशभर आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. साधारण तशाच पद्धतीने या मराठा राजकीय पक्षाचा प्रभाव वाढू लागेल आणि त्यातून प्रस्थापित पक्षांना मोठा हादरा बसेल, असाही तर्क आहे. मात्र राजकीय पक्षांचे प्रमुख, अभ्यासक, लोकप्रतिनिधी यांना अशा प्रकारचा युक्तिवाद मान्य नाही.
समाजाधारित पक्ष खुंटलेले
जातीच्या भावनांना वाचा फोडणे हा काही नवा प्रकार नाही. पण त्याला राजकीय मुलामा दिला की त्याची वाढ होण्याऐवजी ते खुंटले असल्याचा इतिहास सांगतो. शालिनीताई पाटील (क्रांती सेना ), मराठा सेवा संघ (शिवराज्य), पुरुषोत्तम खेडकर (संभाजी ब्रिगेड पक्ष) यांच्या कामगिरीकडे नजर टाकली तर त्यांना मोठी राजकीय झेप घेता आली नाही. त्यामुळे जातीचा वापर राजकीय पक्ष म्हणून करणे चुकीचे असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी नमूद केले आहे. त्यांनी हा पक्ष म्हणजे भाजपचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. याचे संकल्पक सुरेश पाटील हे भाजपात आहेत. संभाजीराजे छत्रपती, विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्याप्रमाणे मानाचे पद भाजपने आपणास द्यावी अशी पाटील यांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपेक्षा आहे, त्यासाठी त्यांनी पक्ष स्थापन करून भाजपवर दबाव आणण्याचा खटाटोप चालवला आहे.
‘मराठा समाज म्हणून पक्ष स्थापन करणे हे फारसे सोपे नाही. धर्म, जातीच्या नांवावर पक्ष स्थापन केला तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही’, असे मत राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांचे म्हणणे आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल समाज सहभागी झाला होता, पण या राजकीय पक्षात ती सर्वसमावेशकता दिसत नाही. राजकीय पक्ष हा विशिष्ट जातीचा असा नसतो. वेगवेगळ्या जाती-धर्माचा त्यामध्ये सहभाग असावा लागतो. ही बाब या पक्षाच्या बाबतीत होत नसल्याने संयोजकांना पूर्वतयारी करण्यापेक्षा थेट पक्षस्थापनेची मोठी घाई झाल्याचे दिसत आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्यापेक्षा दबाव गट निर्माण केला पाहिजे. तोच अधिक प्रभावीपणे काम करून आपल्या मागण्या मान्य करू शकतो, असे निरीक्षण चौसाळकर यांनी नोंदवले.
लोकप्रतिनिधीही साशंक
राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन पाटील हे स्वत:हून राजकीय वादात सापडले आहेत. काँग्रेस सोडलेले पाटील हे सध्या भाजपात आहेत. त्यांनी भाजपाला रामराम ठोकल्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे एकाचवेळी ते दोन्ही डगरींवर पाय ठेवून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपाचे सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर यांनीही ‘सुरेश पाटील हे अद्यापही भाजपामध्ये आहेत. त्यांनी पक्ष सोडलेला नाही’, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. आरक्षणाचा महत्त्वाचा विषय अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची गरज फारशी उरतच नाही,’ असे म्हणत त्यांनी राजकीय पक्ष ही संकल्पनाच वृथा ठरवली. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हा राजकीय पक्ष म्हणजे भाजपपुरस्कृत आहे, अशी टीका केली आहे. ‘या पक्षाकडून फार मोठय़ा अपेक्षा धरणे चुकीचे आहे. उलट भाजपाला सोयीचा असा निर्णय घेण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे,’ असा निष्कर्ष त्यांनी मांडला.