कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शनिवारी सांगली-मिरज शहरातील शाळांमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. आधुनिक जीवनाचा सोबती ठरलेल्या भ्रमणध्वनीवर मराठीचा जागर आज मोठय़ा प्रमाणात करण्यात आला, तर ज्ञानदेवापासूनचा मराठीचा कौतुक सोहळा भ्रमणध्वनीवरील संदेशातून व्यक्त होत होता.
मराठी दिनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राजवाडा चौकात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. मराठी माणसाने मराठीतूनच स्वाक्षरी करावी असे आवाहन यावेळी माजी आ. नितिन िशदे यांनी कार्यकर्त्यांसह केले. यावेळी लावण्यात आलेल्या फलकावर पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी मराठीतून आपली स्वाक्षरी करीत या अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनीही फलकावर मराठीतून स्वाक्षरी करीत मराठी वापराचे आवाहन केले.
जिल्हय़ातील विविध शाळा, महाविद्यालयांतही मराठीचा जागर करण्यात आला. मिरजेच्या कन्या महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत मराठी विभागामार्फत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रा. भरतेश्वर पाटील यांचे व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी प्राचार्य राजू झाडबुके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. जयप्रकाश चंदनशिवे, प्रा. डॉ. सागर लटके यांनी मराठीचे महत्त्व सांगत मायबोलीच आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचे सांगितले.
आधुनिक काळातील समाजमाध्यमातून आज मराठीचा जागर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला. व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर मराठीचा जागर करीत असताना आम्ही किती इंग्रजाळलो आणि यात आमचे मराठीपण कसे हरवत जात आहोत हे सांगत मराठीचे महत्त्व जागविण्याचा प्रयत्न नेटिझन्सनी केला. ज्ञानदेवापासून चोखामेळ्याच्या वेदनेपर्यंत मराठीने जागरण केले असल्याची प्रचिती समाजमाध्यमातून देण्यात आली. शासकीय पातळीवर मात्र आज महिन्यातील चौथा शनिवार असल्याने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यास उत्साहच दिसला नाही.

Story img Loader