कोल्हापूर : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मायमराठीचा गुणगौरव करणारे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात आयोजित ‘कवी कुसुमाग्रज यांची कविता’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राजेंद्र दास यांनी मांडणी केली. कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडीत भारतीय संविधान, श्री ज्ञानेश्वरी, श्री नामदेव गाथा, तुकारामबोवांच्या गाथेचे निरुपण हे ग्रंथ ठेवण्यात आले होते.
स्पर्धांना प्रतिसाद
मराठी भाषा गौरव दिवस हा केवळ एका दिवसापुरता साजरा न करता वर्षातील सर्वच दिवशी मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात करत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे,अशी भूमिका शाळांतून आणि सर्वच कार्यालयातून झाली तर निश्चितच मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने गौरव होईल असे विचार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मांडले. ते कोल्हापूर जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर व श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभात कार्यक्रम अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, कथाकथन, अभिवाचन व कथालेखन या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धामधून यशस्वी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या.
मराठीचे चिंतन
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील सावली सोशल सर्कलच्यावतीने ‘अभिजात दर्जा तर मिळाला पुढे काय?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात समीक्षक, प्रा. रणधीर शिंदे, नाटककार, नाट्यकर्मी विद्यासागर अध्यापक, प्रकाशक अखिल मेहता, लेखिका सोनाली नवांगूळ यांनी भाग घेत भाषाविषयक चिंतन केले. संयोजक किशोर देशपांडे यांनी स्वागत केले.
कुसुमाग्रजांच्या आठवणी
इचलकरंजीतील आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित व्याख्यानात एकता जाधव यांनी ‘अभिजात मराठी आणि कुसुमाग्रज’ या विषयावर आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे होते.
लाभले आम्हास भाग्य !
इचलकरंजीतील सरस्वती हायस्कूल येथे हजारावर विद्यार्थ्यांनी लाभले आम्हास भाग्य, जय जय महाराष्ट्र माझासह मराठी भाषेचा सन्मान करणारी गाणी जितेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जोशपूर्ण सादर केली. संस्थाध्यक्ष अमरसिंह माने, मुख्याध्यापक संजय रेंदाळे उपस्थित होते.