इचलकरंजी येथील शिवाजीनगर बावणे गल्लीतील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या फोडून व शेण टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला. या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढल्याशिवाय कार्यालयाच्या दारातून हलणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. बावणे गल्लीमधील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी दोन महिन्यांपासून नागरिकांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. बुधवारी सकाळी आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत सोबत आणलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडण्यास सुरुवात केली. तसेच शेण फेकत कार्यालयाच्या दारातच ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रश्नी लक्ष घालून आपल्या अधिकारात दारूचे दुकान बंद करावे अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांच्या शिष्ठमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बग्रे यांची भेट घेतली. त्यांनी राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस अधीक्षक राजेंद्र कवाळे यांना बोलावून घेऊन आंदोलकांची मागणी सांगितली. पण हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असल्याने उद्या त्यांच्याशी भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलकांनी लेखी पत्राची मागणी करत पुन्हा ठिय्या आंदोलन केले. तीन तासाच्या आंदोलनांतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नंतर सुटका केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा