लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईच्याविरोधात करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी करवीर तहसील कार्यालयावर शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. आमदार प्रकाश आबीटकर यांनी हे षडयंत्र केल्याचा आरोप करत, त्यांच्यासह राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांना देण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१ जून रोजी कागल तालुक्यातील बिद्री कारखान्याची अचानक तपासणी केली . त्यानंतर २४ जून रोजी या साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्प उत्पादन आणि विक्री हे दोन्हीही परवाने निलंबित केले होते.परिणामी, या साखर कारखान्याअडील रेक्टिफाईड स्पिरीटची विक्री थांबल्याने या साखर कारखान्यासह शेतकऱ्यांचही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

आणखी वाचा-कोल्हापुरात शिवप्रेमींचे रास्ता रोको आंदोलन

त्यामुळे या अन्यायी कारवाईच्या निषेधार्थ आज करवीर तालुक्याती शेतकऱ्यांनी येथील करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाच्या निषेधाचे फलक हातात घेतलेल्या शेतकऱ्यांनी या कारवाईच्या विरोधात राज्य शासन आणि राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांच्यावर आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ही कारवाई असून ती करण्यास भाग पाडणाऱ्यांच्या घरावर शेतकरी मोर्चा काढतील, असा इशारा किरणसिंह पाटील यांनी दिलं. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी अन्यायाविरोधात लढा देतील, असे जयवंत घाटगे-कावणेकर यांनी सांगितले.