लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला ठराविक शेतकऱ्यांचा विरोध आहे असे सांगून राज्य शासनाकडून दिशाभूल केली जात आहे. कोल्हापूर सह सर्व १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या कंत्राटदारधार्जिण्या प्रकल्पास प्रखरपणे विरोध आहे. तो दर्शवण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुंबईत आझाद मैदानावर १२ मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे विधान परिषदेचे गटन येते सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली.

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने येथे राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची भूमिका जाहीर झाल्यापासूनच त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. या भूमिकेला सर्व भागातून पाठबळ मिळत असल्याने हा विषय मागील अधिवेशनामध्ये उपस्थित केला असता मंत्री दादा भुसे यांनी विश्वासात घेऊन मार्ग काढू असे म्हटले होते. मात्र प्रकल्प रद्द झाला पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती आताही कायम आहे.

राज्यकर्ते कोल्हापूर वगळता अन्य ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे सांगून दिशाभूल करत आहे. एका मंत्र्यांने समर्थन असल्याचे विधान करायचे आणि दुसऱ्या मंत्र्यांने विरोधाची भूमिका घेवून विरोधाची जगासुद्धा काबीज करायची असे यामागचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.

कोल्हापूरचा प्रत्येक प्रकल्पाला विरोध असतो अशी चुकीची भूमिका रंगवली जात आहे, असा उल्लेख करून आमदार पाटील म्हणाले, पुणे – कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण , रत्नागिरी – नागपूर महामार्ग, संकेश्वर – बांदा महामार्ग, गगनबावडा महामार्ग या प्रकल्पाला कसलाही विरोध केलेला नाही. शक्तीपीठ महामार्गामुळे बागायती जमीन जाऊन शेतकरी भिकेकंगाल होणार आहे. या प्रकल्पासाठी अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवले जात असले तरी त्याला कोणीही बळी पडणार नाही. कोणाला तरी न्यायालयात पाठवून या प्रकल्पाविषयी भूमिका बदलण्याचा प्रयत्न राहील. अशा प्रवृत्ती पासून सावध राहा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

ठाकरे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शेतकऱ्यांचा विरोध डावलून भूमी संपादनासाठी अधिकारी आले तर त्यांना हिसका दाखवला जाईल, असा इशारा दिला. वाडवडीलांनी जपलेल्या जमिनीवर उदरनिर्वाह होत असल्याने या काळ्या आईशी कदापिही सौदा केला जाणार नाही. शक्तिपीठ प्रकल्पाला जमीन देणार नाही,अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

समन्वयक गिरीश फोंडे, विजयकुमार पाटील सोलापूर, गजेंद्र येळकर लातूर, शांतीभवन कछवे परभणी, संभाजी फरताडे धाराशिव, लालासाहेब शिंदे बीड, बापूराव ढेरे हिंगोली, सुभाष मारेलवर नांदेड, विक्रांत पाटील किणीकर आदींची भाषणे झाली.

Story img Loader