गेली महिनाभर तापलेल्या महापालिका राजकारणातील सत्तासंघर्षांचा कळसाध्याय सोमवारी महापौर निवडीत होणार असून, याकडे अवघ्या करवीरनगरीसह राज्याचेही लक्ष वेधले आहे. घोडेबाजार न करण्याची भूमिका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आनंददायी वातावरण असले तरी महापौर निवडीत नेमके कोण बाजी मारणार, याची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. महापौर निवडीत काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांचे पारडे जड असले तरी भाजपने सविता भालकर तर ताराराणी आघाडीने स्मिता माने यांच्याशी सामना होणार आहे. तर उपमहापौर निवडीसाठी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला, भाजपचे राजसिंह शेळके, ताराराणी आघाडीच्या ललिता बारामते यांच्यात लढत होणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांचे मिळून बहुमत होत असले तरी त्यांनी आपले सर्व सदस्य बाहेरगावी पाठविले आहेत. हे सर्व सदस्य सोमवारी सकाळी दहा वाजता काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. तेथून पाटील यांच्या वाहनातून महापौरपदाच्या उमेदवार रामाणे तसेच सर्व सदस्य महापालिकेमध्ये येणार आहेत.
सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी अमित सनी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्यानंतर जे अर्ज उरतील त्या उमेदवारांना सदस्य हात उंचावून मतदान करणार आहेत. त्याचे चलतचित्रण केले जाणार आहे. इतिवृत्तामध्येही त्याची नोंद केली जाणार आहे. निवडीमध्ये कसलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी आपल्या सदस्यांना पक्षादेश (व्हीप) लागू केला आहे. तरीही ऐनवेळी काही चमत्कार घडतो का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रात्री शिवसेनेची भूमिका निश्चित करण्यासाठी संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या उपस्थितीत बठक सुरू होती. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तीन अपक्षांची भूमिका स्पष्ट झाली नसली तरी ते सत्तेच्या बाजूने राहतील, असे सांगितले जात आहे.

Story img Loader