गेल्या वर्षीच्या ऊस दरातील चारशे रुपयेचा फरक देण्याच्या मागणीबाबत साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली दुसरीही बैठक ठोस निर्णयाअभावी फिस्कटली. चर्चेच गुऱ्हाळ सुरू ठेवून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास, संघर्ष अटळ आहे, असा इशारास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसालाप्रतिटन दुसरा हप्ता ४०० रूपये द्या. अशी मागणी स्वाभिमानीसह शेतकरी संघटनांनी करीत आक्रमक आंदोलन चालवले आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही दुसरी संयुक्त बैठक निष्फळ ठरली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, साखर सहसंचालक डॉक्टर अशोक गाडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील, रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांचेसह विविध संघटनांचे प्रतिनिधी ऊपस्थित होते.
तर एक पाऊल मागे
या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना शेेट्टी यांनी ४०० रुपयाच्या मागणीला आम्ही चिकटून नाही. एक पाऊल मागे घेण्याची तयारी असून साखर कारखान्यानी त्याला प्रतिसाद द्यावा. साखर कारखान्यांच्या अध्यक्ष यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत कार्यकारी संचालक यांनी बैठकीत आश्वासन दिले आहे. तथापि चर्चेच गुऱ्हाळ सुरू ठेवून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यासचर्चेचे दरवाजे यापुढे बंद केले जातील,असा इशारा दिला.
पालकमंत्र्यांसमवेत चर्चा ?
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने शेतकरी संघटनांनी आंदोलन करावे.ऊस दरातून मार्ग काढण्याकरिता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा करून कारखान्याचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची समन्व बैठकीसाठी आपण चर्चा करणार असल्याचे सांगितले.