लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर या महामार्गात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला चार पट मोबदला मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी मी व हातकणंगलेचे आमदार अशोक माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच याप्रश्नी मुंबई येथे बैठक घेण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, त्यामुळे लवकरच याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

जैनापुर ता. शिरोळ येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग कसा करावा या मागण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन चौकशी केली. या वेळी आमदार यड्रावकर हे उपोषणकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

रत्नागिरी ते नागपूर या महामार्गासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपटदाराने मोबदला शेतकऱ्यांना आला केला आहे परंतु अंकली ते चोकाक या ३३ किमी अंतरातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, एकाच महामार्गावरती अधिग्रहण केलेल्या जमिनींना वेगवेगळे दोन दर दिल्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही, या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली असून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले आहे.

तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पटवून दिले आहे, याबाबत येत्या आठ दिवसात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजन करून हा प्रश्न निकाली लावण्याची ग्वाही आमदार यड्रावकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रकाश पाटील, अमोल कांबळे, अनिल पाटील, विजय पाटील, सचिन चौगुले, लालासो रणवरे, राजू बिरंजे, विद्याधर पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader