कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत शनिवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे बैठक होऊनही कोणताच निर्णय  झाला नाही. या पदासाठी दावा करणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार सतेज पाटील यांनी तासभर याबाबत चर्चा करूनही काहीच निष्पन्न झाले नाही. आवाडे गटाला पुन्हा तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील हे गेली १७ वष्रे या पदावर आहेत. विधान परिषद निवडणूक सुरू असताना आवाडे यांनी उमेदवारी मागितली होती. सतेज पाटील यांना उमेदवारी देताना आवाडे यांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनवले जाईल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र गेल्या आठवडय़ात पुन्हा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी पाटील यांची निवड करण्यात आली. त्यावर आवाडे गटाने वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला. आमदार सतेज पाटील यांनी आवाडे यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे बैठक घेऊया, तोपर्यंत निर्णय थांबवा, असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी अशोक चव्हाण यांच्याकडे बैठक होऊनही कोणताच निर्णय झाला नाही. प्रकाश आवाडे व सतेज पाटील यांनी तासभर याबाबत चर्चा  करून पक्षबांधणी, संघटनात्मक काम यासाठी बदल होण्याची गरज विशद केली. चव्हाण यांनी म्हणणे ऐकून घेतले, पण कसलाही ठोस निर्णय घेतला नाही.
बैठक नव्हती- चव्हाण
 आजच्या बैठकीची विचारणा केली असता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कसलीही बैठक झाल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बदलाबाबत बैठक नव्हती. काही जण चच्रेला आले होते. अशा चर्चा नेहमी होत असतात.

Story img Loader