दयानंद लिपारे
कोल्हापुरातील पोलिश वसाहतीला आज पोलंडच्या राजदूतांची भेट
गोष्ट दुसऱ्या महायुद्धातील. हिटलरने पोलंडवासीय ‘ज्यू’नागरिकांचा अमानुष नरसंहार सुरु केल्याने त्यांच्यावर ‘दे माय धरणीठाय’ अशी अवस्था ओढवली होती. जगातील अनेक देशांनी निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रयाचे दरवाजे बंद केले असताना हिंदुस्थातील दोन संस्थानांनी ज्यूंना आपल्या पदरात घेतले. ही संस्थाने होती कोल्हापूर आणि जामनगर. आज इतक्या वर्षांनंतरही करवीर नगरी आणि पोलंडवासीयांचे दृढ संबंध आहेत. याच ममत्वाच्या संबंधांना उजाळा देण्यासाठी, त्यावर राजमुद्रा उमटवण्यासाठी पोलंडचे राजदूत आणि उच्चायुक्त उद्या मंगळवारी कोल्हापूर भेटीवर येत आहेत. विशेष म्हणजे पोलंडवासीयांना उदार अंत:करणाने आश्रय देणाऱ्या राजांचे विद्यमान वारस छत्रपती संभाजीराजे यांनीच पोलंडच्या या महनीयांना निमंत्रित केले आहे. या भेटीसाठी पोलंडवासीयांचा मुक्काम असलेले वळिवडे गावही आतुर झाले आहे.
दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूर छत्रपतींनी आश्रय दिला होता. येत्या सप्टेंबर महिन्यात त्या घटनेला ८० वर्ष पूर्ण होत आहेत. हाच धागा पकडून संभाजीराजेंनी पोलंडच्या राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. त्याचा एक भाग म्हणून पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्त डेमियन आयरझिक हे २५ व २६ मार्च रोजी कोल्हापूर भेटीवर येत आहेत.
पोलिश निर्वासितांची सुसज्ज वसाहत
पोलंडच्या कैद्यांसाठी कोल्हापूर संस्थानामार्फत कोल्हापूरपासून ५ किमी अंतरावर वळिवडे कॅम्प म्हणजे आताचे गांधीनगर येथे कुटुंब छावण्या (बरॅक) बांधण्यात आल्या. १९४३ पासून पुढे पाच वर्षे या ठिकाणी सुमारे १० हजार लोकांच्या, विशेषत: महिला आणि मुलांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी दोन स्वयंपाक घर, स्नानगृह आणि व्हरांडा अशा स्वरूपाचे घर बांधून दिले होते.गरजेच्या वस्तू त्यांना सहजपणे मिळण्यासाठी एक बाजारपेठही त्यांना पुरवण्यात आली. त्यामुळे ही छावणी लवकरच एक सुसज्ज वसाहत म्हणून नावारूपाला आली.
वळिवडे हीच जन्मभू !
पोलंडच्या निर्वासितांनी वसाहतीत बागा फुलवल्या. तेथील रस्त्यांना पोलिश नावे दिली. शाळा, दवाखाना आणि एक चर्चही उभे राहिले. इतकेच नाही, तर दिवसातून एकदा चित्रपट दाखवणारे एक थिएटरही इथे उभारले. जगभरात युद्धज्वर शिगेला पोचला असताना या छावणीत दहा हजार पोलिश ‘ज्यू’ नागरिक अत्यंत गुण्यागोविंदाने रहात होते. कित्येकांचे बालपण तर इथे गेले, पण कित्येकांची जन्मभूमीही हीच छावणी ठरली ! यातून कोल्हापूरच्या वळिवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे. येथे जन्मलेली पोलिश मुले ‘वळिवडे कॅम्प’ ही आमची पहिली जन्मभूमी आहे, अशा भावना व्यक्त करतात.
दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंड वासीयांना कोल्हापूरकरांनी आश्रय दिला होता. यातील काही नागरिकांनी कोल्हापूरला भेट देऊन आपल्या आठवणी जागृत केल्या होत्या. त्याला अनुसरून पोलंडच्या राजदूतांशी संवाद साधण्यात यावा, अशी सूचना मी सभापतींना राज्यसभेत केली होती . या सूचनेवरून पोलंडशी शासनामार्फत चर्चा झाल्यानंतर पोलंडचे उच्चायुक्त व भारतातील पोलंडचे राजदूत कोल्हापूर भेटीस येत आहेत.
– खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती