कोल्हापूर : राज्याचे मँचेस्टर अशी प्रतिमा असलेली वस्त्रनगरी इचलकरंजीची शुक्रवारपासून वाहन – वाहतूक क्षेत्रात ‘एमएच ५१’ ( MH – 51) अशी नवी ओळख दृढ होत आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी मंजूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
सध्या ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून सोमवारपासून वाहन विषयक कागदपत्रे प्रत्यक्षात मिळण्यास सुरुवात होणार असल्याने इचलकरंजीकरांसाठी हि महाशिवरात्रीची भेट मिळाली असून आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होते. भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी एम एच ५० साठी प्रयत्न केले पण होते पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय ताकद भारी पडल्याने कराड येथे ते कार्यालय सुरु झाले. पुढे आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा सुरु ठेवल्यावर गतवर्षी मे महिन्यात गृह विभागाने मंजुरीचा आदेश प्रसूत केला. या कार्यालया करिता शहापूर विश्रामगृहाची जागा मिळाली असून एक इंटरसेप्टर वाहनास मंजुरी मिळाली आहे.
हेही वाचा >>> मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’चा वाढदिवस मुख्यमंत्र्यांनी केला साजरा
स्पर्धा ५१ साठीची
एमएच ५१ असा क्रमांक इचलकरंजी येथे नोंदणी होणाऱ्या वाहनांना मिळाणार असून हि नवी शृंखला सुरु होत आहे. इचलकरंजीला हा क्रमांक मिळाला तेव्हा नाशिक- मालेगाव, नाशिक रोड, देवळाली भाग तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर यांचेही दावे सुरु होते. त्यात इचलकरंजीने बाजी मारली.
अशी झाली तयारी
तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्या वतीने स्वखर्चातून ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्यात आला आहे. सर्व निकषानुसार तयार केलेल्या ट्रॅकचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांया अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी येत्या याठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केली होती. त्यानुसार कामकाज सुरु झाले असून रिक्षा आणि अन्य वाहनांची ब्रेक टेस्ट घेऊन त्यांना सर्टीफिकेटचे वितरण करण्यात आले.
शहापूर मध्ये कार्यालय
शहापूर गेस्ट हाऊस याठिकाणी उभारण्यात येणार्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामाची आमदार प्रकाश आवाडे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. कामाची माहिती घेत आवश्यक त्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांना वाहन पासिंगसाठी कोल्हापूरातील मोरेवाडी येथे जावे लागत असे. त्यामुळे वाहनधारकांचा संपूर्ण दिवस आणि आर्थिक अपव्यय व्हायचा. वाहनधारकांची ही समस्या जाणून घेऊन आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी तारदाळ येथे केएटीपी संस्थेच्या वतीने स्वमालकीच्या जागेवर नियमानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करुन घेतला आहे. फोटो – इचलकरंजीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदघाटन केले. सोबत आमदार प्रकाश आवाडे.