कोल्हापूर : इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. यामुळे ‘एमएच ५१’ ही इचलकरंजीची वाहन क्रमांक श्रेणीची नवी ओळख बनणार आहे. या निर्णयाचे स्वागत करणारे संदेश समाज माध्यमातून अग्रेषित करण्यात आले. इचलकरंजीला मंजूर झालेला एमएच ५१ हा क्रमांक नाशिक ग्रामीण व अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील असल्याचाही दावा काही बढाईखोरांनी सुरू केला असल्याने समाज माध्यमात नाहक वादाला सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होणार असून त्याचा लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती दोन दिवसापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली होती. पाठोपाठ आज गृह विभागाने तो आज प्रसूत केला. या कार्यालया करिता इचलकरंजी महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तात्काळ करावी असे या शासन आदेशात म्हटले आहे. नवनिर्मित कार्यालयासाठी एक इंटरसेप्टर वाहनास मंजुरी देण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरंजी यांना या कार्यालयाचे प्रमुख घोषित करण्यात आले आहे.

नाशिक कि इचलकरंजी?

दरम्यान इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होऊन त्यासाठी एमएच ५१ ही वाहन क्रमांक श्रेणी मिळणार असल्याचे शासन निर्णयांमध्ये जाहीर करण्यात आले आहे. मात्र काही अतिउत्साही लोकांनी त्याला वेगळे वळण देत नाशिक ग्रामीण ही एमएच ५१ असा क्रमांक असल्याची बढाई सुरू केली. तथापि नाशिक येथे एमएच १५  हा क्रमांक असून या जिल्ह्यातील मालेगाव करिता एमएच ४१ असा क्रमांक आहे. शिवाय नाशिक तालुक्यातील नाशिक रोड, देवळाली भागात आणखी एक उपप्रादेशिक कार्यालय सुरू व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर काहींनी हा क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील असल्याचाही दावा केला आहे. तथापि हा क्रमांक इचलकरंजीचा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mh 51 will become the new identity of ichalkaranji vehicle number range ysh
Show comments