कोल्हापूर : ‘राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनी लाँड्रिंगचे काम करीत आहात, असे सांगून तोतया पोलीस उपायुक्ताने पुण्यातील निवृत्त शिक्षकेची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाहून मी उडालो आहे. अशा फसवणुकीच्या घटना वारंवार कशा घडतात, याबाबत सायबर क्राइम विभाग, राज्य शासन करते काय,’ असा प्रश्नांचा भडीमार मंत्री हसन मुश्रीफ यांनी करून शासनाला घरचा आहेर दिला. ‘अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली .
हेही वाचा >>> नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या ७० वर्षीय उषा मुरलीधर व्यास या निवृत्त शिक्षिकेला एका व्यक्तीने फोन करून आपण पोलीस उपायुक्त नरेंद्र गुप्ता बोलत आहोत, तुम्ही हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनी लाँड्रिंगचे काम केले आहे. याप्रकरणी अटक करून मुंबईला ठेवले जाईल, असे कळवले. त्यावर या महिलेने यातून वाचायचे कसे, अशी विचारणा केल्यावर पलीकडून बोलणारा तोतया उपायुक्त नरेंद्र गुप्ता याने २० लाख रुपये खात्यात पाठवावे. त्याची तपासणी करून पैसे परत केले जातील, असे सांगितले. त्यावर या शिक्षिकेने २० लाख रुपये पाठवले. पण, नंतर संबंधिताचा मोबाइल बंद झाला. त्यामुळे या महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे येथे फिर्याद दाखल झाली आहे.
हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृह आगीचा न्यायसहायक विज्ञान विमा कंपनीकडून आढावा
या घटनेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्याबाबत ते म्हणाले, ‘ही घटना वृत्तपत्रात वाचून मी उडालो आहे. यापूर्वी कागलच्या निवेदिता घाटगे यांची वीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आता माझ्या नावाचा वापर करून फसवणुकीची घटना घडली आहे. मला बदनाम करण्याचे षडयंत्र दिसते.’ तथापि, अशा घटना राज्यात वारंवार होत असताना, ‘सायबर क्राइम विभाग काय करतो, शासन या प्रकरणी काय करते,’ अशी विचारणा करून हसन मुश्रीफ यांनी, ‘संबंधितांना कडक शासन व्हायला हवे,’ असे मत व्यक्त केले.