कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. त्यावरील उपचारासाठी निधीची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षच्या धर्तीवर आरोग्य विभागामार्फत राखीव निधी उभा करून ५ लाखांवरील उपचारासाठी रुग्णांना मदत करण्यात होईल, असे विधान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी केले. ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर ( ता. राधानगरी ) येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या शुभांरभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागाने खासगी दवाखान्यांच्या सेवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा द्यावी. रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात यावीत. रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले यांनी सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात गेल्या ४ महिन्यात १५० शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख यांनी मानले.