दोन ते तीन गाडय़ा असणाऱ्या शहरातील फेरी विक्रेत्यांवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. याबाबत महापालिकेत झालेल्या पदाधिकारी, नगरसेवक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशा फेरी विक्रेत्यांची माहिती संकलन करून त्या फेरीवाल्यास एकच जागा देण्यात यावी, बायोमेट्रिक कार्डधारकांनाच यामध्ये प्राधान्य देण्यात यावे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीच्या मार्गावर आहे, त्यामुळे बिनखांबी गणेश मंदिर रोड ते जोतिबा रोड, महाद्वार रोड या ठिकाणी नो हॉकर्स झोन करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना या वेळी देण्यात आल्या.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याच्या सुरू असलेल्या कारवाईबाबत महापालिका पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांची संयुक्त बैठक छत्रपती ताराराणी सभागृहात संपन्न झाली. सध्या शहरामध्ये फेरीवाला झोन निश्चित करून पट्टे मारण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये काही ठिकाणी नागरिक व व्यापाऱ्यांचा विरोध होत आहे. या रोषास स्थानिक नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. रामाणे यांनी प्रत्येक प्रभागामध्ये स्थानिक नगरसेवकास विश्वासात घेऊनच फेरीवाला झोनचे नियोजन करावे असे आदेश प्रशासनास दिले.
उपनगरामध्ये जुने फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. त्या ठिकाणी इतर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. महाद्वार रोडवरील सारडा दुकान ते पापाची तिकटी या ठिकाणी व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने तेथे पुनर्वसन करण्यात येऊ नये. कपिलतीर्थ मार्केटमधील पाíकंगच्या जागेत सर्वाना जागा देता येईल का, याची माहिती घ्यावी. मलखड्डा येथे महापालिकेची अद्ययावत इमारतीचे नियोजन आहे. या ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसनाचे नियोजन केले आहे. भविष्यात सदरची इमारत बांधताना पुन्हा या फेरीवाल्यांना हटवावे लागणार आहे. त्यामुळे तेथे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येऊ नये. रहिवाशी क्षेत्रात फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येऊ नये. शाहूपुरी रेल्वे फाटक येथे सांगली-मिरजेचे फेरीवाले येऊन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे बायोमेट्रिक कार्ड कशी आलीत. ते स्थानिक लोकांना तेथे बसू देत नाहीत. बायोमेट्रिक कार्डसाठी आधार कार्ड, रहिवास दाखला व नगरसेवकाचा दाखला आवश्यक करा. त्यामुळे अधिकृत लोकांचेच पुनर्वसन करता येईल, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, सुनील पाटील, नगरसेवक परमार, शेखर कुसाळे, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, अर्जुन माने, राहुल माने, तौफिक मुल्लाणी, किरण नकाते यांनी चच्रेत सहभाग घेऊन वरील मुद्दे उपस्थित केले. उपायुक्त विजय खोराटे, उपशहर अभियंता एस. के. माने, एस.के. पाटील, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, सचिन जाधव उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा