कोल्हापूर : ग्रामीण भागातील, विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या भूमिकेबरोबर मला राहावे लागणार आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शेती धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे, असा उल्लेख करीत एकनाथ शिंदे शिवसेनेचे करवीर मतदार संघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढ समर्थनास नकार दर्शवला. कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार नरके यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी हद्दवाढीला समर्थन असल्याचे पत्र द्यावे, अशी मागणी केली. मात्र, चर्चा संपली तरी नरके यांनी असे पत्र दिले नाही.

उलट, शहरातील लोक ग्रामीण भागात राहण्यासाठी जात आहेत, याकडे लक्ष वेधले. यावेळी नरके यांनी कोल्हापूर महापालिकेची परिवहन सेवा थांबवणे, महापालिकेकडून ग्रामीण भागाला होणारा पाणीपुरवठा बंद करणे, अशा हद्दवाढ कृती समितीच्या भूमिकेने प्रश्न सुटणार नाही, असेही स्पष्ट केले.

घोर निराशा

मी, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक असे एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर बैठक घेऊ, असे नरके यांनी स्पष्ट केले. यामुळे कृती समितीची घोर निराशा झाली.