कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छबी झळकल्या आहेत..यामुळे या पत्रिकेची चर्चा होत आहे.राज्य शासनाने विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. असाच कार्यक्रम कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज , कडगाव या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुश्रीफ यांनी गडहिंग्लज ,कडगाव परिसरात आयोजित केला आहे.
यासाठी त्यांनी एक कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रतिमा आहेत. ‘ईडी’चा संबंध? ‘ ईडी’ची कारवाई सुरू असताना मुश्रीफ यांनी अशा प्रकारची पत्रिका छापली आहे का, अशी चर्चा होत आहे. तथापि, कार्यक्रम पत्रिकेवरून गैरसमज करून घेण्याची गरज नाही. जाहिरात आणि ईडी चौकशी याचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले आहे.