कोल्हापूर : इचलकरंजी येथे मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानावरील इंग्रजी भाषेतील पाट्या तोडून काळे फासले. यावेळी दुकानदार पोलीस व मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला.
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच दुकानदारांनी मराठ्या पाट्या लावाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही अनेक ठिकाणचे मॉल, दुकानदारांनी इंग्रजीत पाट्या लावल्या आहेत. याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या वतीने आज इचलकरंजीत मुख्य मार्गावर इंग्रजी पाट्या काढून टाकल्या. त्यांना काळे फासण्यात आले. काही दुकानांच्या पाट्या फोडण्यात आल्या.
हेही वाचा – “आमचे कोट तयार”, मंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मी शंभर टक्के…”
यावेळी आंदोलक, दुकानदार, पोलीस यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला. काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना शांत केले. उद्यापासून दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर त्या फोडल्या जातील, असा इशारा मनसेचे रवी गोंदकर, प्रताप पाटील, महेश शेंडे, शहाजी भोसले, योगेश दाभोळकर आदींनी दिला.