कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज संध्याकाळी अधिकृत प्रचार संपताच लक्ष्मीदर्शनाचा कार्यक्रम जोरात सुरू झाला. यंदाच्या या निवडणुकीतच या पैसे वाटपाच्या घटना अनेक ठिकाणी घडल्याच्या तक्रारी आल्याचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनीही मान्य केले.
महापालिका निवडणुकीसाठी गेली १५ दिवस विविधांगी प्रचाराची राळ उठली होती. गेले दोन दिवस प्रचार शिगेला पोहोचला होता. प्रचारादरम्यान उमेदवारांनी आपल्या कार्यक्षमतेबरोबरच शुध्द चारित्र्याचा दावाही केला होता. पण मतदान खेचण्यासाठी तो पुरेसा ठरत नाही हे लक्षात आल्यावर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी लक्ष्मी दर्शनाचे अस्त्र बाहेर काढले आहे. मतदारांशी थेट संपर्क साधून मतदानाचे आवाहन करतानाच त्याच्या हाती लक्ष्मीचा प्रसाद ठेवला जात होता. प्रभागातील सर्व उमेदवारांनी याच तंत्रावर भर दिल्याचे मतदारांच्याही लक्षात आले. काही हव्यासू वृत्तीच्या मतदारांनी आपला दर वाढवला. उमेदवारांकडे चक्क मतासाठी पाच आकडी रकमेची मागणी झाली. एनकेन प्रकारे निवडून यायचेच, असा पण केलेल्या मोजक्या धनिक उमेदवारांनी अशा प्रकारची मागणी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी आíथकदृष्टय़ा तितक्या प्रमाणात संपन्न नसणाऱ्या उमेदवारांना हात चोळीत गप्प बसावे लागत आहे. तर काही सामान्य मतदारांनी मिळेल ते घ्या, पण मताचे दान आपल्या झोळीत टाका असा प्रचार सुरू केला आहे.
मतदारांना भुलविण्यासाठी लक्ष्मीदर्शन सुरू केले असले तरी वाढत्या मागण्यांमुळे उमेदवारांच्या तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. पशाची गरज भासू लागल्याने सावकारांकडे तगादा सुरू केला आहे. या स्थितीचा फायदा घेत सावकारांनी चढय़ा व्याजदराने पसा पुरवण्यास सुरुवात केली आहे. पशाचा नंगा नाच सुरू राहून मतदाराची दिवाळीपूर्वीच दिवाळी होत असली तरी उमेदवारांचे मात्र दिवाळे निघाले आहे.
मतदारांना पसे, किमती भेटवस्तू देण्याचे सत्र उघडपणे सुरू असताना निवडणूक विभाग व पोलीस यंत्रणा मात्र सुस्त आहे. निवडणूक विभागाने भरारीपथक तनात केल्याचे तर पोलीस यंत्रणेने खास विभाग सुरू केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात या यंत्रणेला खुलेआम पसा, भेटवस्तू सुरू असताना एकावरही थेट कारवाई करता आलेली नाही. यातूनच या विभागाची कार्यक्षमता आणि इच्छाशक्तीचेही पोकळ अस्तित्व जाणवू लागले आहे. सभांमध्ये राजकीय पक्षांनी पसे वाटपाचा उघडउघड प्रयोग सुरू असल्याचे वारंवार म्हटले असले तरी ते मात्र या बहिऱ्या शासकीय यंत्रणेस ऐकू येत नाही, हेच त्यांच्या निष्क्रिय कृतीतून दिसत आहे, असा आरोपही सजग सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा