मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू होण्याची अपेक्षा भंग झाल्याने आंदोलनाची धार तीव्र होत चालल्याचे बुधवारच्या हालचालीवरून स्पष्ट झाले. या प्रश्नी गुरुवारी सर्वपक्षीयांच्या वतीने कोल्हापूर बंद ठेवून शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच महापालिकेची होणारी सर्वसाधारण सभा निवृत्त मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांचा निषेध नोंदवून तहकूब केली जाणार असल्याचे महापौर वैशाली डकरे यांनी सांगितले.
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील वकील, पक्षकार गेल्या २८ वर्षांपासून लढा देत आहेत. यासाठी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार, धरणे आंदोलन, आत्मदहन यासह विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत कोल्हापूर खंडपीठाबाबतच निर्णय निवृत्तीपूर्वी घेऊ, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी खंडपीठ कृती समितीस पणजी येथील बठकीदरम्यान आश्वासन दिले होते. शहा यांनी खंडपीठाबाबत निवृत्तीच्या अखेरच्या दिवशीही कोणताच निर्णय न्यायाधीशांनी दिला नाही. उलट उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी (फुल हाऊस) कोल्हापूर खंडपीठाबाबत आपला अभिप्राय देऊन येणाऱ्या मुख्य न्यायाधीशांनी याबाबत निर्णय घ्यावा असे आदेश देत मुख्य न्यायाधीशांनी खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित ठेवला. या निर्णयाचा मंगळवारी शहांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, पुतळय़ाचे दहन आदी मार्गाने वकील संघटनांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान, बुधवारपासून तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वकिलांनी घेतला. त्याला कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत प्रतिसाद मिळाला. शहरासह अन्य ठिकाणी वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमून निषेधाच्या घोषणा दिल्या.
महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करणार असल्याचे महापौर वैशाली डकरे यांनी बुधवारी सांगितले. त्या म्हणाल्या, वकिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कोल्हापूरच्या प्रथम नागरिक या नात्याने आपला पािठबा असून गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. पूर्वनियोजित महापालिकेची सर्वसाधारण सभा न्यायमूर्ती मोहित शहा यांचा निषेध नोंदवून तहकूब करणार असल्याचे सांगितले.
खासदार धनंजय महाडिक यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी खंडपीठ हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने कोल्हापुरात सíकट बेंच स्थापना होणे आवश्यक आहे. टोलमुक्तीसाठी ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या जनतेने आंदोलन उभे केले त्याच पद्धतीने लोकलढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
आमदार अमल महाडिक म्हणाले, भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात असून मंत्रिमंडळाचा ठराव देण्याचे महत्त्वाचे काम सरकारने केले, मात्र शहांनी निर्णय घेतला नाही. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करण्याचा माझा प्रयत्न असेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी रास्त आहे. खंडपीठाच्या या लढय़ामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही खंडपीठ कृती समितीच्या बरोबरीने उतरणार आहे.
खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्याची अपेक्षा भंगल्याने आंदोलनाची धार तीव्र होत चालल्याचे स्पष्ट झाले.
Written by अपर्णा देगावकर

First published on: 10-09-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement in kolhapur for bench demand