कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी योग्य स्थिती उपलब्ध आहे. यासंबंधीचे सादरीकरण खंडपीठ कृती समितीच्या निमंत्रकांसह सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांसमोर सादरीकरण केले. न्यायाधीशांनी याप्रश्नी अभ्यास करून निर्णय देण्यात येईल असे आश्वासित केले. हायकोर्टातील खोली नंबर ५५ या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आलोक आराध्य तसेच मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. चंदुरकर, एम. एस. सोनक, श्रीमती रेवती मोहिते-ढेरे पाटील,. रविंद्र व्ही. घुगे यांचे सोबत खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.
खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत, ॲड संतोष शहा, ॲड. संग्राम देसाई यांनी कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती कोल्हापूर विभागातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये असणारे प्रलंबित खटले त्याचबरोबर भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरचे महत्त्व आणि कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन करण्याकरिता असणारे अत्यंत पूरक वातावरण याविषयी माहिती दिली.
तसेच विमानसेवा, रेल्वे सेवा त्याचबरोबर पक्षकारांना न्यायिक सुविधा न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून मिळावेत याकरिता कोल्हापूरसह सहा जिल्ह्यां पासूनचे मुंबईपर्यंतचे अंतर व कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन झाल्यास पक्षकांराची होणारी सोय व न्यायाची गरज अशा सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी, त्यांच्या कालावधीमध्ये निश्चितपणे निर्णय होईल अशी आशा करण्यास हरकत नाही या शब्दांत शिष्टमंडळाला आश्वस्त केले. चर्चेत कोल्हापूरचे अॅड विवेक घाटगे, वसंतराव भोसलेा्र, विवेक घाडगे, सातारा बारचे अध्यक्ष विकास पाटील, सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी निशिकांत पाटोळे, रत्नागिरी बारचे उपाध्यक्ष निनाद शिंदे, सांगलीचे श्रीकांत जाधव, कराडचे संभाजी मोहिते उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य न्यायाधीश अलोक आराध्य यांना शाल, श्रीफळ, पानविडा व कोल्हापुरी फेटा देऊनत्यांचा सत्कार केला. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा फोटो देण्यात आला.
चर्चेदरम्यान निमंत्रक खोत यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर प्रशासकीय न्यायमूर्तींना कोल्हापूरला येण्याकरिता निमंत्रित केले. सरन्यायाधीश व प्रशासकीय न्यायमूर्तींनी विनंती मान्य केली. दरम्यान खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी राजू ओतारी, लोकल ऑडिटर कर्णकुमार पाटील तसेच माजी अध्यक्ष ॲड. रणजीत गावडे, शिवाजीराव राणे ,राजेंद्र चव्हाण, प्रशांत शिंदे ,अजित मोहिते, त्याचप्रमाणे एडवोकेट राजेंद्र मंडलिक ,पिराजी भावके, सुनील गावडे ,विजय महाजन, आर .आर.तोष्णीवाल ,अमित सिंग उपस्थित होते.