कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराच्या शेजारील शेतकरी सहकारी संघाची वास्तू अधिग्रहित करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेला शनिवारी उच्च न्यायालयाने गैर ठरवले आहे. अशा प्रकारे कोणतीही जागा अधिग्रहित करता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवताना न्यायालयाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना फटकारले आहे. आगामी नवरात्र उत्सवाची तयारी महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरू झाली आहे. यावर्षी भाविकांची गर्दी वाढणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत शेतकरी संघाची भवानी मंडपातील भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला अशी इमारत अधिग्रहित करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली होती. लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी ही इमारत ताब्यात घेतली. आता तेथे भाविकांसाठी दर्शन मंडप सुविधा उपलब्ध केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्याचे एकत्रिकरण हाच पर्याय!

मात्र, या निर्णयाला शेतकरी संघाच्या अशासकीय प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने २४ ऑक्टोबर रोजी दसरा संपल्यानंतर २७ ऑक्टोबर पर्यंत वास्तू संघाच्या ताब्यात द्यावी, अशा प्रकारे कोणतीही जागा ताब्यात घेता येणार नसल्याचे न्यायालयाने निक्षून सांगितले आहे. तसेच जितका काळ ही इमारत वापरली आहे त्याचे भाडे द्यावे, असे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी प्रशांत भालके, उत्कर्ष देसाई या वकीलांनी संघाची बाजू मांडली, अशी माहिती अध्यक्ष देसाई यांनी दिली.

हेही वाचा : ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या, अमोल मिटकरींनी मागितली माफी; नेमकं काय घडलं?

शेतकरी संघाचा जल्लोष

उच्च न्यायालयाने संघाच्या बाजूने निकाल दिला त्यावर आज संघाचे अध्यक्ष सुरेश देसाई, कार्यकारी संचालक सचिन सरनोबत यांच्यासह पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.