कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) हा स्वत:हून कागल पोलीस ठाण्यात हजर राहिला. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलीस कोठडी देण्याचा आदेश देण्यात आला. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील हत्याकांड केल्याने कागल शहर हादरून गेले.

 काल दुपारी दोन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ही घटना घडत राहिली. प्रकाश माळी हा कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो. पत्नी गायत्री (वय ३७) कुणाशी तरी भ्रमणध्वनीवर बोलत असल्याचा रागातून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वेळी प्रकाशने गायत्री हिचा गळा आवळून खून केला. आठवीत शिकणारा मुलगा कृष्णात (वय १३) हा सायंकाळी शाळेतून घरी परत आला. त्याने हा प्रकार पाहून ‘पप्पा असे का केले?’ असे विचारले. आपल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार? या शंकेने प्रकाशने त्याचा मुलगा कृष्णात यालाही दोरीने गळा आवळून ठार मारले. रात्री आठच्या सुमारास अकरावीत शिकणारी मुलगी अदिती (वय १७) ही घरी आली. ती ही घटना पाहून दंगा करणार हे लक्षात घेऊन तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. ती आरडाओरड करत असताना प्रकाशने तिच्या डोक्यात वरवंटा मारला व त्यानंतर गळावरून खून केला. प्रकाश हा हमीदवाडा साखर कारखान्यात कामगार होता. त्याची पत्नी गायत्रीबरोबर नेहमी वाद होत असे.

Story img Loader