शिवाजी पुलानजीक मंगळवारी तरुणीचा झालेला निर्घृण खून हा हल्लेखोरांनी अवघ्या २० ते २५ मिनिटात केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून या आधारे ही माहिती बुधवारी पुढे आली आहे. मात्र अद्यापही या तरुणीची ओळख पटली नाही. शिवाजी पुलापासून पाटील महाराज समाधीकडे जाणाऱ्या गायरान जागेत गट नं ५५ मध्ये तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळून आला. गळ्यावर तीन, पाठीवर सुमारे अकरा, पोटावर चार, हातावर तीन यांसह सुमारे पंचवीस वार तरुणीच्या शरीरावर करण्यात आले होते. याची माहिती पोलिसांना दिली. काही मिनिटातच करवीर पोलीस उपाअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  मृतदेहाचे कपडे, वेशभूषा तसेच कंबरेमध्ये असणारा काळ्या रंगाचा कडदोरा यांच्या साहाय्याने मृत तरुणी पश्चिम बंगाल राज्यातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. दरम्यान पोलिसांनी शहरासह, पन्हाळा या ठिकाणच्या लॉजची पाहणी करून संबंधित तरुणीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम मंगळवारपासूनच सुरू केले होते. ९ ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.

Story img Loader